भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणार फायनल
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था।
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसर्या सेमी फायनलमध्ये विक्रमी धावसंख्या उभारणार्या न्यूझीलंडच्या संघासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ ठरलाय. न्यूझीलंडच्या संघानं फलंदाजीनंतर गोलंदाजीत दिमाखदार कामगिरी करुन दाखवली.
दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी पराभूत करत त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता 9 मार्चला दुबईच्या मैदानात रंगणार्या फायनलसाठी किवींचा ताफा लाहोरहून दुबईची फ्लाइट पकडेल. यंदाच्या हंगामात भारत विरुद्ध न्यूझीलंड असा फायनल सामना पाहायला मिळेल. दुसरीकडे आयसीसी स्पर्धेतील मोक्याच्या क्षणी नांगी टाकणार्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोकळ्या हाती घरी परतण्याची वेळ आली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिमवर रंगलेल्या दुसर्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रचिन रविंद्र 108 (101) आणि केन विलियम्सन 102 (94) या जोडीनं शतकी खेळी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. अखेरच्या षटकात डॅरियल मिचेलनं 37 चेंडूत केलेल्या 49 धावा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या भात्यूान 27 चेंडूत आलेली 49 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 50 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 362 धावांसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारत दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले होते.
विक्रमी धावांचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात, अन् शेवटी पुन्हा लागला चोकर्सचा टॅगविक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना रायन रिकलटेन आणि कर्णधार टेम्बा बवुमा या जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर अवघ्या 20 धावा असताना मॅट हॅन्रीनं 20 धावांवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. टेम्बा बवुमानं अर्धशतक साजरे केले. पण त्याच्या स्लो खेळीनं दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी आणखी वाढवल्या. तो 71 चेंडूत 56 धावांची खेळी करून तंबूत परतला. रॅस्सी व्हॅन डेर दुसेन याने 66 चेंडूत 69 धावांची खेळी केली. मार्करम 29 चेंडू 31 धावा करून तंबूत परतला. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. डेविड मिलरच्या भात्यातूनही नाबाद शतक आले, पण तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या हातून मॅच निसटली होती.
रचिन-केन जोडी जमली
पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला लुंगी एनिग्डीनं पहिला धक्का दिला. विल यंगला त्याने 21 धावांवर माघारी धाडले. पण त्यानंतर केन आणि रचिन जोडी जमली. तिसर्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. रचिन रविंद्रनं आपल्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तो 101 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 108 धावा करुन बाद झाला. ही विकेट गमावल्यावर केन विलियम्सन याने वनडे कारकिर्दीतील 15 व्या शतकाला गवसणी घातली. शतकी खेळीनंतर आक्रम अंदाजात खेळताना तो बाद झाला. त्याने 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय डॅरिल मिचेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 49-49 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विक्रमी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.