। उरण । वार्ताहर ।
जिद्द असली की, वयाला सीमा राहात नाहीत. याच उक्तीप्रममाणे उरण, बाजारपूर येथे रहाणार्या 11 वर्षीय स्वराज पाटीलने पोहण्याचा विक्रम केला आहे. मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी 12 कि.मी. अंतर त्याने पोहून पार केले आहे. उरणच्या सेंटमेरीज कॉन्व्हेंट स्कुलमध्ये सहावी इयत्तेमध्ये शिकणारा स्वराज आपल्या आईचा वारसा पुढे नेत असून, त्याला आणखी विक्रम करायचे असल्याचे सांगत आहे.
उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये सराव करणारा स्वराज आज विक्रमादित्य म्हणून ओळखला जाणार आहे. बुधवारी पहाटे 4 वाजून 39 मिनिटांनी मोरा प्रवासी जेट्टी येथून त्याने समुद्राच्या लाटांवर झेप घेत मुंबई, गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने प्रवास सुरु केला. समुद्राच्या मोठ्या लाटा, सोसाट्याचा वारा, पाण्याचे बदलणारे प्रवाह, काळोख आणि समुद्रातील मोठ-मोठी जहाजं अशा अडचणीतून वाट मोकळी करत स्वराजने अवघ्या 4 तास 25 मिनिटात मुंबई गाठात आपला विक्रम पूर्ण केला आहे.
यावेळी स्वराजला शुभेच्छा देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे मोठी गर्दी जमा झाली होती. तर या प्रत्येकाने उपस्थिती दर्शवून स्वराजच्या विक्रमाची साक्ष दिली आहे. महत्वाचे म्हणजे स्वराजची आई सोनाली संतोष पाटील ही स्वतः एक जलतरणपटू असून, तिने 25 वर्षापूर्वी मोरा ते गेटवे ऑफ इंडिया पोहून पार करण्याचा विक्रम केला होता. तर स्वराजचे आजोबा, मामा, भाऊ, बहीण असा संपूर्ण आजोळ परिवार जलतरणपटू असून, प्रत्येकाने अशाप्रकारे विक्रम केले आहेत. यामुळेच स्वराजला हा वारसा त्याच्या आजोळातून मिळाला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद महाराष्ट्रात हौशी जलतरण संघटनेने घेतली असून, हा विक्रम पूर्ण केला असल्याची अधिकृत घोषणा निरीक्षक शैलेश सिंग यांनी विक्रम पूर्ण होताच केली. यावेळी संघटनेच्यावतीने प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन स्वराज पाटीलला गौरविण्यात आले.