मुरूडच्या मार्केटमध्ये म्हावर्‍यांचा लॉट

बोंबील, मांदेली, कोळंबीची आवक
खवय्यांची चंगळ
मुरूड | वार्ताहर |
मुरुडच्या मासळी मार्केट मध्ये बुधवारी मासळी खवय्यांची चांगलीच चंगळ उडाल्याचे दिसून येत होते. मुरूडच्या मार्केटमध्ये बोंबील, मांदेली, लाल टायनी कोळंबी अशी मासळीची पलटी मोठया प्रमाणावर विक्रीस आली होती आणि खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत होते. बुधवार हा मोकळा वार असल्याने आणि ईद निमित्त सुट्टी असल्याने नोकरदार मंडळी देखील मासळी खरेदीसाठी बाहेर पडलेली दिसत होती.

गेले 10 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले होते. बुधवार सकाळी पावसाने मोकळीक दिल्याने खवय्ये नागरिक चिकन आणि उपलब्ध मासळी खरेदीसाठी लगबगीने मार्केटकडे जात होते.या प्रसंगी बाजारपेठेत बकरी ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देताना हिंदू – मुस्लिम बांधव दिसून येत होते. मटण घेण्यासाठी देखील मुस्लिम- हिंदू बांधवांनी सकाळीच हजेरी लावल्याचे दिसत होते.

राजपुरीची ताजी मासळी
राजपुरी समुद्रकिनारी उथळ समुद्र किनारी पट्टीत पावसाळ्यात सुरक्षितता राखून काही छोट्या होड्या आसपास मासेमारीस जातात.यातून बोंबील, मांदेली, कोलंबी आदी प्रकारातील मासळी मिळते. ही ताजी मासळी बर्फात न ठेवता 4 किमी वरील मुरुड शहराच्या मार्केटमध्ये विक्रीस आणली जाते.अशी ताजी मासळी खूपच चविष्ट लागते.गटगटे बोंबील, ताजी कोलंबी, मांदेली थेट येथुन विकत घेऊन फ्राय किंवा रस्सा केल्यास चिकन,मटणाचा रस्सा देखील त्या पुढे फिका पडतो. पावसाळ्यात येथील कोळी ग्रामस्थांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही.त्यामुळे जी छोटी मासळी मिळेल ती विक्री करण्यासाठी येथील कोळी महिला मासळी घेऊन, शिघ्रे, आगरदंडा, राजपुरी, माझेरी, मुरूड, खारआंबोली, जोसरंजण, गोयगान, वाणदे, तेलवडे परिसरात विक्रीस जातात. बोंबील,मांदेली ही मासळी मानवाच्या मेंदू साठी अत्यंत उपयुक्त समजली जाते .या मध्ये मेहनत जादा आणि फायदा कमी असा प्रकार असून प्राप्त परिस्थितीत देखील समाधानाची लहेर त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येते.

Exit mobile version