सांगोला येथे गणपतराव देशमुखांना अभिवादन
सांगोला | नविद पठाण |
निष्ठा आणि तळमळ असेल तर आमदारांना कोणत्याही सरकारकडून निधी मिळविता येऊ शकता हे गणपतराव देशमुख यांनी कृतीतून दाखवून दिले, असे गौरवौद्गार शेकाप सरआ.जयंत पाटील यांनी शनिवारी (30 जुलै) काढले.सरकारी निधी मिळविण्यासाठी कुणालाही पक्ष बदलावा लागत नाही, किंवा निष्ठा विकावी लागत नाही आणि खोकी सुद्धा अजिबात घ्यावी लागत नाहीत, अशी खरमरीत टीकाही पाटील यांनी केली. गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोल्याचा नावलौकिक वाढला होता.पण विद्यमान आमदारांमुळे काय तो सांगोला असे म्हणण्याची वेळ आली आहे,अशी टीकाही त्यांनी केली.
ज्येष्ठ नेते.स्व.गणपतराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिनी सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की, मला सांगोला तालुक्यातील शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, ज्यांनी गणपतराव देशमुख सारख्या शेकापच्या नेत्याला गेली 55 वर्षे तालुक्याचे विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी दिली. जेवढ्या निष्ठेने तुम्ही आमच्या नेत्याला एवढी वर्षी संधी दिली तीच परंपरा येथून पुढे चालू ठेवायची आहे. आबासाहेबानी सांगोला तालुक्यात निष्ठेने शिक्षण संस्था व इतर विविध संस्था उभा केल्या तो नावलौकिक टिकवायचा आहे. मी व्यावसायिक आहे,मी आमदारकीचा पगार घेत नाही हीच तत्वे शेकापक्षाची असे त्यांनी नमूद केले.
ज्यावेळी राज्यातील सत्तेत असताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला, तेव्हा शेकापच्या आमदारांनी आठतासाच्या आत मंत्रीपदाचा राजीनामा दिला.गणपतराव देशमुख यांनी तर त्याच दिवशी सांगोल्याची एस. टी.पकडली याची आठवणही त्यांनी उपस्थितांना करुन दिली.
जरी आबासाहेब आपल्यातून गेले असले तरी या तालुक्यातील गरीब कार्यकर्त्यांची निष्ठा बघून मलाही ऊर्जा मिळते. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक नवीन नेतृत्व निर्माण होईल. आम्ही आमदारकी कोणाला मिळेल याचा विचार करत नाही, गरिबांच्या व कष्टकर्यावरील निष्ठा असेलतर तर आमदारकी मिळतेच. मलाही कधी वाटले नव्हते की ,मी आमदार होईन पण मीही गेली 25 वर्षे आमदार आहे.असे त्यांनी नमूद केले.
भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद
आ.जयंत पाटील हे भाषण करण्यासाठी उभे राहिले त्यावेळी पावसानेही जोरात सुरुवात केली.त्या परिस्थितीतही पावसात भिजत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.उपस्थितांनीही सभामंडपातील खुर्च्या चक्क डोक्यावर घेत त्यांचे भाषण ऐकले.

बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात पुन्हा एकदा शेकापला उभारी द्यायची आहे.आमदार कोण होणार, कुणाला उमेदवारी दिली जाणार हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. अथवा त्याचा मोह आम्हाला नाही.जनतेचे प्रश्न सुटावेत हेच शेकापचे ध्येय आहे.
आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस
मुंबईच्या विकासात लाल बावट्याचे योगदान
मुंबईच्या विकासात भांडवलदारांचे नव्हे कामगारांचे महत्वाचे योगदान आहे. मुंबई वाचविण्यासाठी लाल बावट्याने मोठ्या प्रमाणात चळवळी उभ्या करुन विकास केला आहे. राज्यपालांना महाराष्ट्र कळलाच नाही, असे सांगून आ.जयंत पाटील यानी भगतसिंग कोश्यारी यांच्या वकत्व्यचा निषेध केला.
दरम्यान, गणपतराव देशमुख यांना असंख्य ज्येष्ठ नागरिक युवक, महिला भगिनी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी आबासाहेबांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित जनसमुदायने अमर रहे.. अमर रहे.. आबासाहेब.. अमर रहे च्या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला.
यानिमित्ताने ह.भ.प साखरे महाराज गेवराई यांच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पसायदानानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रीमती रतनकाकी गणपतराव देशमुख यांच्या हस्ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जेष्ठ चिरंजीव पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियाांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना यांच्या वतीने सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या प्रांगणात त्यांच्या समाधी स्थळी हा पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माजी मंत्री आ. दत्ता भरणे, वैभव नाईकवाडी, आ. गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, आ. निलेश लंके, माजी आ. रामहरी रुपनवर, राजन पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, भाऊसाहेब रुपनर, सागर पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, तहसीलदार अभिजीत पाटील, प्रा.रोंगे ,माजी सभापती राणी कोळवले, प्रा.नानासाहेब लिगाडे, बाबा करांडे, तालुका चिटणीस दादाशेठ बाबर ,शहर चिटणीस अँड. भारत बनकर, सभापती गिरीश गंगथडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, गिरीश नष्टे, अॅड.. सचिन देशमुख, माजी नगराध्यक्षा राणी माने ,माजी नगरसेविका छाया मेटकरी, माजी सभापती मायाक्का यमगर, विविध सहकारी संस्थेचे आजी- माजी चेअरमन, सरपंच ,उपसरपंच शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मान्यवरांनी उपस्थित राहून समाधीस्थळी अभिवादन केले. आ.समाधान आवताडे,आ.निलेश लंके,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार रामहरी रुपनवर, अभिजीत पाटील, बाळासाहेब ठवरे, बाळासाहेब काटकर, सुरज बनसोडे, विवेक कोकरे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले तर आभार चंद्रकांत देशमुख यांनी मानले.