लखनऊचा हैद्राबादवर दणदणीत विजय

निकोलस पूरनचा झंझावात

| मुंबई | प्रतिनिधी |

सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियममध्ये सामना रंगला. हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एसआरएचच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. हेनरिक क्लासेन आणि अब्दुल समदच्या अप्रतिम फलंदाजीमुळं हैद्राबादने 20 षटकांत 182 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर विजयासाठी 183 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी धमाका केला.

लखनऊची सुरुवात खराब झाल्यानंतरही निकोलस पूरन आणि प्रेरक मंकडने धडाकेबाज फलंदाजी करत लखनऊला विजय मिळवून दिला. मंकडने 45 चेंडूंत 64 धावांची नाबाद खेळी केली. तर, पूरनने 13 चेंडूंत 44 धावांचा पाऊस पाडला. मार्कस स्टॉयनिसनेही 25 चेंडूंत 40 धावांची खेळी साकारली. या धावांच्या जोरावर लखनऊने 183 धावा करून हैद्राबादवर सात गडी राखून विजय मिळवला. ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्माला प्रत्येकी एक बळी घेण्यात यश मिळालं.

हैद्राबादसाठी सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तार माघारी परतला. त्यानंतर अनमोल प्रीतने 36 धावांची खेळी साकारून हैद्राबादच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. राहुल त्रिपाठीने 20 तर कर्णधार एडन मार्करमने 28 धावांची खेळी केली. त्यानंतर हेन्री क्लासेन आणि अब्दुल समदने जबरदस्त भागिदारी करून हैद्राबादची धावसंख्या वाढवली. त्यामुळे 20 षटकांत हैद्राबादने सहा विकेट्स गमावत 182 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून हैद्राबादच्या फलंदाजांना गुंडाळलं.

कर्णधार कृणाल पांड्याने एकाच षटकात दोन बळी घेऊन हैद्राबादच्या संघाला मोठा धक्का दिला. पांड्याने मार्करमला 28 धावांवर असताना बाद केलं. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सचा त्रिफळा उडवला. फिलिप्स शून्यावर बाद झाल्याने हैद्राबादच्या धावसंख्येची गती मंदावली. परंतु, हेन्री क्लासेननं पुन्हा एकदा सावध खेळी करून 29 चेंडूत 47 धावा कुटल्या. तर अब्दुल समदने 25 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकराच्या मदतीनं 37 धावांची नाबाद खेळी केली. लखनऊसाठी कृणाल पांड्याने दोन विकेट्स घेतल्या. युधवीर चरक, अमित मिश्रा आणि यश ठाकूरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Exit mobile version