| सावंतवाडी | प्रतिनिधी |
मालवण तालुक्यातील देवली येथील खालची परबवाडी येथे भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर सुमारे 5 किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा कोसळला. या भीषण प्रहाराने घराच्या छपराची कौले आणि लाकडी रिप तुटून मोठा आवाज झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विजय देऊळकर यांचे कुटुंब आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. घरातील महिला अर्चना विजय देऊळकर स्वयंपाकघरात असताना अचानक मोठा आवाज झाला. त्यांनी धावत जाऊन पाहिले असता, छप्पर फोडून एक अजस्त्र बर्फाचा तुकडा स्वयंपाकघरात पडला होता. घराचे छप्पर फुटल्याने आणि कौले उडाल्याने आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली. घटना घडली तेव्हा परिसरात ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचे कोणतेही संकेत नव्हते. भर उन्हात आकाशातून थेट 5 किलोचा बर्फाचा तुकडा पडल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. देऊळकर यांच्या घराच्या अवतीभवती कोणताही उंच रस्ता किंवा चढण नसताना हे घडल्याने ही बाब रहस्यमय बनली आहे.







