लम्पीचा फैलाव दुधातून नाही; पशुधन विभागाची माहिती
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. या आजाराबद्दल अनेक नागरिकांमध्ये समज-गैरसमज पसरत आहेत. परिणामी, काही लोकांनी दूध घेणे व पिणे बंद केले असून, याचा फटका पाली सुधागडसह जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे. अनेक उकडे बंद झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.
लम्पीचा फैलाव दुधातून होत नाही. याबद्दल पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली आहे. तरीही याबाबत लोकांमध्ये चिंता व भय आहे. परिणामी, धोका नको व खबरदारी म्हणून काही लोकांनी दूध सेवन करणे बंद केले आहे. कोरोनामुळे गावखेड्यातील दुग्ध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले होते. आता कुठे पुन्हा एकदा हा व्यवसाय रुळावर येत असताना लम्पीमुळे पुन्हा या व्यवसायावर काळे ढग आले आहेत.
लम्पी रोगाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकांना वाटते की दुधातूनसुद्धा हा आजार पसरतो. त्यामुळे भीतीपोटी अनेक ग्राहकांनी दुधाचे उकडे बंद केले आहेत. त्यामुळे धंद्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभाग लोकांमध्ये जनजागृती करत आहे. मात्र, अधिक लोकांपर्यंत हे जनजागृती झाली पाहिजे.
राम तुपे, दूध व्यावसायिक, कोंडगाव, सुधागड
लम्पी आजार दुधातून होतो ही अफवा असून, बिनधास्त दूध प्या. लम्पीबाधित जनावराचे दूध पिता येऊ शकते. आपण दूध 100 डिग्री सेल्सिअसला उकळून घेतो. त्यामुळे कोणताही विषाणू या तापमानाला जिवंत राहू शकत नाही. लम्पीमुळे दुधाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही.
डॉ. प्रशांत कोकरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, सुधागड
जिल्ह्यात कर्जत तालुक्यात आठ लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत. त्यांचे लसीकरण करून विलगिकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाच बाधित क्षेत्र आहेत. लम्पी रोग देशी गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. संकरित गायींवर होत नाही. त्यामुळे दुधावर आत्तापर्यंत काही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात एकूण 2 लाख 39 एकूण जनावरांची संख्या आहे. त्यातील गोवंश संख्या आहे दीड लाख व उर्वरित 89 हजार महिष (म्हैस) वर्ग जनावरे आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली.
गैरसमाजामुळे धंद्यावर परिणाम
जिल्ह्यात 15 तालुक्यात मिळून संघटित, असंघटित नोंदणीकृत व अनोंदणीकृत, किरकोळ विक्री करणारे असे साधारण 20 ते 25 हजार दूध व्यावसायिक आहेत. लम्पीच्या गैरसमजुतीमुळे ग्राहकांनी दूध बंद केल्याचा फटका साधारण 10 ते 15 टक्के व्यावसायिकांना बसला असण्याची शक्यता आहे.