हजारो चाहत्यांनी दिला साश्रुपूर्ण निरोप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देणारे आणि अलिबाग-उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे गुरूवारी निधन झाले. वाढदिवशीच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते 74 वर्षांचे होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून ते आजारी होते. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मधुकर ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला. अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय वाटचाल सुरु झालेल्या मधुकर ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र आयुष्यभर त्यांनी काँग्रेस विचाराची साथ सोडली नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक समर्पक लोकसेवक हरपला आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सात पुत्र, तीन कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मधुकर ठाकूर यांच्या अलिबाग-शितोळी आळी येथील निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता गर्दी केली होती. यावेळी अलिबाग परिसरात शोकाकुल वातावरण होते. मधुकर ठाकूर यांच्या जाण्याने अलिबाग काँग्रेस पक्षाची कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी मुंबई काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, मुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाच्या वतीने अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार भाई जगताप म्हणाले, की मधू ठाकूर म्हणजे काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्यातील 24 कॅरेट सोने होेते. 2004 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते आणि आपण एकाच बाकावर विधानसभेत बसत असू. यावेळी त्यांनी तुम्ही माझे शिक्षक आणि मी तुमचा विद्यार्थी असे नाते जोडले. रायगडचा वाघ असाच त्यांचा उल्लेख करता येईल, असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी मुंबई काँग्रेसच्या वतीने 19 जुलै रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, मुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक आदींनी आपल्या भावना व्यक्त करुन मधुकर ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
झिराड ग्रामपंचायतीचे सरपंच, जि.प. सदस्य आणि मग आमदार अशी राजकीय वाटचाल त्यांची होती. राजकीय परंपरा नसलेल्या घरातून मधू ठाकूर आलेले. जनतेचे प्रश्न सोडविण्याचा, जनतेशी संपर्क ठेवण्याचा चांगल्या प्रकारे त्यांचा प्रयत्न होता. पक्षाकडून त्यांना म्हणावी तशी साथ मिळाली नाही, तरी सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले. त्यांनी जी चांगली कामे केली, त्याची आठवण अलिबागकरांना राहील.
आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप