विद्यार्थ्यांसाठी तिकीटाच्या दरात सवलत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई पुणेच्या धर्तीवर आता अलिबागमध्येदेखील जादुचे प्रयोग पहावयास मिळत आहे. प्रसिध्द जादूगर जितेंद्र रघुवीर यांचे अनेक नवीन जादूचे प्रयोग मेघा चित्र मंदिरात शनिवार व रविवार असे दोन दिवस होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी तिकीटाच्या दरात सवलत ठेवण्यात आली असून अलिबागकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
येत्या शनिवारी (दि.7) रात्री नऊ वाजता आणि रविवारी (दि.8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जादूचे प्रयोग घेण्यात येणार आहेत. या प्रयोगाच्या दरम्यान यूरोप, सिंगापूर, अमेरिकेतून आणलेल्या नवीन जादूसोबत 9 फुटी जापनीज डायनोसोर, होम मिनिस्टर, सुर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्सप्रेस, माझा कट्टा, खाली डोकं वर पाय,आम्ही सारे खवय्ये, खुपते तिथे गुप्ते आणि चला हवा येऊ द्या वर गाजलेल्या जादू आणि परदेशातून आणलेले खास नवीन जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी अलिबागमधील जादूप्रेमी रसिकांसाठी मिळणार आहे. युरोप, अमेरिका, सिंगापूर, गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, पनवेल, सांगली, संभाजीनगर, बीड, कल्याण, डोंबिवली,कराड, इस्लामपूर, तासगाव, अकलूज, विटा, पलूस, सातारा, मिरज, सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सिन्नर, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव आणि जळगाव मधील हाऊसफुल्ल शोज नंतर सर्व बालगोपाल, आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्यासह सर्वांसाठी शंभर टक्के मनोरंजनाची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
जादूगार रघुवीर-विजय-जितेंद्र रघुवीर पिता-पुत्रांचे हे विक्रमी 16065 आणि 16066 प्रयोग आहेत. भारतात प्रथमच अनेक नवीन प्रयोग जपानची 3 भुते, बॉक्स ऑफ मोगली, हाऊस ऑफ मायाजाल, गिफ्ट बॉक्स आणि जितेंद्र रघुवीर यांची स्पेशल जादू रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. गेल्याच महिन्यात जादूगार जितेंद्र रघुवीर व्हिएतनाममध्ये तर गेल्या वर्षी युरोप अमेरिकेत आणि सिंगापूर यशस्वी दौरा करून आले.तेथून आणलेली नवीन जादूदेखील या निमित्ताने अनुभवता येणार आहे. दरम्यान जादूचे प्रयोग सुरु होण्यापुर्वी शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जादूगर जितेंद्र रघुवीर डोळ्यावर पट्टी बांधून अलिबाग बाजारपेठेतून दुचाकी चालविणार आहेत. जादूचे प्रयोग पाहण्यासाठी लवकरात लवकर तिकीट नोंदणी करण्यात यावी.
या खास प्रयोगासाठी शालेय विद्यार्थ्यांना तिकिटामागे 100 रुपयांची विशेष सवलत देण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.