डॉ. नानासाहेब धार्माधिकारी यांना स्वच्छतेतून अभिवादन
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.2) महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील विविध शहरांमधील सरकारी कार्यालयांचे परिसर आणि प्रमुख रस्ते तसेच शहराला जोडणार्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. हे अभियान सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाला हजारो श्री सदस्यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी जिल्हाभरातुन हजारो टन कचरा संकलित करण्यात आला.
रोह्यामध्ये स्वच्छता मोहिम
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.2) रोहा शहरातील सरकारी कार्यालयांचे परिसर आणि प्रमुख रस्ते तसेच शहराला जोडणार्या रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत हे अभियान घेण्यात आले होते. यावेळी एकूण 14 हून अधिक सरकारी कार्यालये, शहरातील संपूर्ण रस्ते, बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी या परिसरातील पालापाचोळा, गवत, प्लास्टीक आदी कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. तसेच, 35.9 टन कचरा गोळा करून डंपिंग ग्राऊंडमध्ये नेण्यात आला.

या अभियानामध्ये श्री सदस्यांसह इतर व्यक्तींनीदेखील उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. त्यामध्ये 1 हजार 78 श्री सदस्य आणि 141 हून अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. यावेळी रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजयकुमार येडके, नायब तहसीलदार राजेश थोरे, रोहा पोलीस ठाणे, वन विभाग आणि एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
कोन समितीच्यावतीने महास्वच्छता अभियान
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ बैठक कोन समितीच्यावतीने पनवेल शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रविवार दि.2 मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानात कोन समिती विभाग अंतर्गत मोहोपाडा, शिवनगर, भोकरपाडा, भाताण, कोनसह वीस श्री समर्थ बैठकीतील सदस्यांचा समावेश होता. यावेळी स्वच्छता मोहिमेत जवळपास 3300 सदस्यांनी भाग घेतला होता.यावेळी सदस्यांच्या हातात झाडू,विला,फावडा आदी उपकरणे दिसून आली.तसेच हातात हात मौजे, मास्क घालून शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 12 एकराचा परिसर स्वच्छ केला. यावेळी साचलेला पालापाचोळा,टाकाऊ कचरा ,प्लास्टीक एकत्रित करुन पनवेल महानगरपालिकेच्या वाहनांतून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात आला. यानंतर स्वच्छता मोहिमेची सांगता होताच पुन्हा सहभागी झालेल्या सदस्यांची हजेरी घेण्यात आली. ही स्वच्छता मोहिम शिस्तबध्द पध्दतीने राबविताना सदस्य दिसून आले.
तळा शहरात महास्वच्छता अभियान
महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या दि. 1 मार्च रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दि.२ मार्च रोजी तळा शहरात श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी1943 पासून अध्यात्म, शिक्षण, आरोग्य व व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,आरोग्य शिबीर,दिव्यांगव्यक्तींना साहित्य वाटप,नैसर्गिक आपत्कालीन मदत, रक्तदान, धंरणातील गाळ काढणे यांसारखे अनेक उपक्रम गेली कित्येक वर्षे सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविले जातआहे. तसेच यावेळी ओला व सुका मिळून 6 टन कचरा संकलित करण्यात आला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त महास्वच्छता अभियान
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणी तसेच महाराष्ट्रासह देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पाली येथे घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात बल्लाळेश्वर मंदिर परिसर, शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, पोलीस स्टेशन, कृषी खाते व वन विभाग, बांधकाम विभाग व शासकीय विश्रामगृह, पंचायत समिती, पाली बाजारपेठ, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, हटाळेश्वर चौक परिसराची श्रीसदस्यांनी स्वच्छता केली . सकाळी 8 वाजल्यापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली . या अभियानात 817 श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन हातात ग्लोज, झाडू, खुराल, पंजे यांचा वापर करून हे अभियान यशस्वी केले. या वेळी पालीतुन सुका कचरा 25.4 टन आणि ओला कचरा 8.7 टन जमा करून ट्रॅक्टर, टेम्पो यांच्या माध्यमातून डंपिंग मैदानात साठविण्यात आला.