। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शफाली वर्माने वादळी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयसाठी 148 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मेग लॅनिंग 2 धावा करत स्वस्तात बाद झाली. पण शफालीने संघाचा डाव उचलून धरला आणि जोनासनने तिला चांगली साथ दिली. शफालीने 43 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 80 धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर जेस जोनासनने 38 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह 61 धावांची खेळी केली. शफाली आणि जेसने शतकी भागीदारी करत अवघ्या 15.3 षटकांत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
तत्त्पूर्वी आरसीबीच्या संघाने एलिस पेरीच्या 60 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 147 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना पुन्हा एकदा या सामन्यात फेल ठरली आणि 8 धावा करत बाद झाली. यानंतर डॅनियल वेट 21 धावा करत बाद झाली. तर एलिस पेरी आणि राघवी बिश्त यांनी चांगली भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
एलिस पेरीने 47 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 60 धावा केल्या. तर राघवी बिश्तने 32 चेंडूत 2 षटकारांसह 33 धावांची खेळी केली. याशिवाय इतर सर्व फलंदाज फेल ठरले. दिल्लीकडून शिखा पांडे आणि नवी गोलंदाज चारनी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. तर मारिजन काप एक विकेट घेण्यात यशस्वी ठरली.
आरसीबीला यंदाच्या सीझनमध्ये श्रेयंका पाटील-आशा शोभना या गोलंदाजांची कमी भासत आहे. आरसीबीकडून या सामन्यात फक्त रेणुका सिंग ठाकूर एक विकेट घेऊ शकली. आरसीबीला यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीग सीझनमध्ये गोलंदाजांची कमी भासत आहे.
संघाचे तीन महत्त्वाचे गोलंदाज श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि सोफी मॉलिन्यू हे यंदाच्या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. संघात किम गार्थ, रेणुका सिंग ठाकूर, जॉर्जिया वेयरहम आणि स्नेह राणा हेच मुख्य गोलंदाज आहेत. तर एलिस पेरीलाही यावेळेस फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. श्रेयंका पाटील गतवर्षी संघाची स्टार गोलंदाज होती. तर सोफी मॉलिन्यू अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरली होती. आरसीबीने सुरूवातीचे काही सामने जिंकले, पण घरच्या मैदानावर आरसीबीला एकही सामना जिंकता आलेला नाही. गोलंदाजीसह संघाची कर्णधार स्मृती मानधनाही गेल्या 4 सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्मात नाही. दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह अव्वल स्थान कायम ठेवलं. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 7 सामने खेळले असून 5 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 10 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. इतर संघांचे गुण पाहता दिल्ली टॉप 3 मध्ये कायम राहिल हे स्पष्ट दिसत आहे. आता अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. दुसरीकडे, आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान आता डळमळीत झालं आहे. आरसीबीने सहा पैकी 4 सामने गमावले आहेत आणि त्यांच्या खात्यात आता फक्त 4 गुण आहेत.