। मुंबई । वृत्तसंस्था ।
अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पंजाबी असूनही विकीने या चित्रपटातून मराठी माणसाचे मन जिंकले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या सिनेमानंतर विकीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विकीने 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता ‘कणा’ सादर केली. विकीचे मराठी, त्याचा उच्चार आणि मराठी भाषेबद्दलचे प्रेम पाहून प्रेक्षक भारावून गेले. विकीची क्रेझ तर वाढत चालली आहे. सेलिब्रेटी देखील विकीचं कौतुक केल्याशिवाय पुढे जात नाहीत.
केवळ चाहतेच नाही तर अनेक कलाकार आणि सेलिब्रिटीही विकीच्या या भूमिकेचे कौतुक करत आहेत. अलिकडेच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ‘छावा’ पाहिला आणि विकीसाठी खास पोस्ट शेअर केली. सूर्यकुमारने थेट मराठीत त्याची प्रतिक्रिया दिली. सूर्याने सिनेमातील एका दृश्याचा फोटो शेअर केला ज्यात छत्रपती संभाजी महाराज सिंहाला मारत आहेत तो सीन आहे. या फोटोला कॅप्शन देताना सूर्याने मराठीत लिहिले, “भावा प्रॉपर छावा’’. यासोबतच त्याने फायर, हार्ट आणि नजरेचे इमोजीही पोस्ट केलेत. विकीनेही सूर्याची ही पोस्ट रीपोस्ट करत “भावा!’’ असा रिप्लाय दिला.
‘छावा’ प्रदर्शित झाल्यापासून 14 दिवसांत जगभरात 555.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर भारतात या चित्रपटाने 484.3 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट दुसर्या आठवड्यातही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. आता तिसर्या आठवड्यात ‘छावा’ची कमाई किती होते हे पाहणे महत्त्वाचे असेल.