गटारांवरील स्लॅब कोसळले, काही ठिकाणी तडे
| कोलाड | वार्ताहर |
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची मागील पंधरा दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना संबंधित अडचणी दूर करुन महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. मात्र, जलद गतीने सुरू असलेल्या कामावर कोणाचे नियंत्रण नसल्याने केलेल्या काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गटार लाईनवरील स्लॅबला काही ठिकाणी तडे गेले असून, काही ठिकाणचे स्लॅब कोसळल्याचे भयानक चित्र निदर्शनास आले आहे. त्यामुळे जलद गती कामाचा दर्जा असाच असेल, तर ते काम किती काळ टिकेल, यावरील चर्चांना उधाण आले आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी सार्व. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते रत्नागिरीदरम्यानच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी नागोठणे ते इंदापूरदरम्यानच्या कोलाड आंबेवाडी नाका, भिरा फाटा, तिसे तळवली येथील नागरिकांशी संवाद साधत पाहणी करत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना ही कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने करा, अशा सूचना दिल्या. तद्नंतर तिसे तळवलीत सुरू असलेल्या कामाबाबत येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर केलेल्या कामात आरसीसी गटारावर टाकण्यात आलेल्या स्लॅबला तडे जात आहेत, तर चक्क एका ठिकाणी आठ-दहा दिवसांपूर्वी केलेल्या कामातील स्लॅबच कोसळले, त्यामुळे हे काम कसे केले जात आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कामावर कोणाचे नियंत्रण नसून, किती काळ हे काम टिकणार आहे, त्यावर सार्यांची कुजबूज सुरू झाली असल्याचे समजते. मात्र, मंत्री महोदयांच्या पाहणी दौर्यात ज्या सूचना कामाच्या बाबतीत दिल्या गेल्या, त्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेकेदाराची कामात हयगय दिसून येत आहे. तिसे तळवली येथे गटार लाईनच्या कामात ठेकेदार यांच्याकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसून येत आहे. अशा कामाचा फटका येथील ग्रामस्थांना बसून, त्यांच्या जीवितास धोकादायक ठरू शकेल, असे सर्वत्र बोलले जात आहे.