| मुंबई | दिलीप जाधव |
सरकार हे शेतकरी विरोधी असून, तीन बाजूला तीन तोंडं असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्नतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे रविवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचाराच्या घटना, राज्यातील जनतेची सरकारकडून होत असलेली फसवणूक यावर विरोधकांनी आरोप केले. या बैठकीला शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद व आमदार सुनील प्रभू, आमदार भास्कर जाधव, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ उपनेते अमीन पटेल, आमदार भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक उपस्थित होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळून आले तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. स्वारगेट एसटी बस डेपोतील तरुणीवर बलात्काराच्या घटनेवर निषेध करण्याऐवजी गृहमंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं असून, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही.
बीड प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी सेवा दिली जाते. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना सात हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे, सरकार यावर कोणतीही भूमिका घेत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणार्या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देत आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचे अवमान करण्याची केलेली परंपरा आजही सुरू असून, हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत, यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पांघरून घालण्याचं काम हे सरकार करत असल्याबाबत अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वाहनांच्या नवीन प्लेट नंबरसाठी इतर राज्यांच्या तुलनेत आकारण्यात येत असलेले जादा शुल्क, कृषी विभागात बदल्यांसाठी झालेला भ्रष्टाचार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी सरकारने दाखवलेली तत्परता, लाडकी बहीण योजनेत सुरू असलेली कपात, लाडक्या भाऊ योजनेतील लाभार्थ्यांनाही पैसे न मिळणे यावरून दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले.
सोयाबीनच्या उत्पादनापेक्षा नाफेडने संथगतीने खरेदी केली असून, व्यापार्यांकडून शेतकर्यांची लूट सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने शेतकर्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा व सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यावरून घुमजाव केले आहे. जलजीवन मिशन योजनेतील 40 टक्केच काम पूर्ण झाले असून, यातील निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा आरोप केला.
सरकारचा हा अर्थ नसलेला अर्थसंकल्प अधिवेशन आहे. केलेल्या तरतुदी, दिलेला निधी व झालेला खर्च यांची सांगड घातल्यास हा ढोबळ अर्थसंकल्प असणार आहे. गेल्यावेळी ज्याप्रमाणे आकडेवारी फिरवून सांगण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न यंदाही होईल. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून, प्रथा व परंपरा यात विसंवाद असल्याची टीका काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील परंपरा, संस्कृती लोप पावत चाललेली आहे, जोपर्यंत हा संवाद होत नाही, तोपर्यंत चहापानावर बहिष्कार राहील, अशी आमची भूमिका असेल, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
रस्ते, पाणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीतही या सरकारच्या काळात घोटाळा झाला आहे. मंत्रिमंडळात कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करा, आम्ही साथ देऊ, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले. सरकारने केंद्रात संमतीसाठी पाठविलेला शक्ती कायदा राष्ट्रपती यांनी परत पाठवला हे सरकारच अपयश आहे. तीन पक्षात पालकमंत्री नंतर मालक मंत्री कोण यावर वाद आहे, मात्र आमच्यात महाराष्ट्राच्या हितासाठी वाद आहे. एकप्रकारे सत्ताधार्यांच स्वार्थी राजकारण सुरू आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर गंभीर आरोप केले.