डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

| डोंबिवली | वृत्तसंस्था |

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातील उमेदवारांत चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी डोंबिवलीत युवा सेना नेते आदित्य ठाकरे, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.

यावेळी इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मोठी गर्दी दिसून आली. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. निवडणूकांच्या काळात कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन म्हणजे एक वेगळा उत्साह, जोशपूर्ण वातावरण शहरात पहायला मिळते. शिवसेनेतील फुटीनंतर पहिलीच लोकसभेची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे वातावरण असून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कळवा मुंब्रा, कल्याण डोंबिवली, दिवा, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, 14 गाव परिसर येथून शिवसैनिक दरेकर यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी युवा सेना नेते आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई, आमदार जितेंद्र आव्हाड, सदानंद थरवळ, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी हृता आव्हाड, महेश तपासे यांसह अनेक पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

Exit mobile version