महाजने ग्रामस्थांच्यावतीने उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, अंगारा स्पोर्टस् क्लब व श्री महाजनाई स्पोर्टस् क्लब यांच्या वतीने श्री महाजनाई व महामारी देवीचा उत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी (दि.23) सकाळपासून हा उत्सव होणार आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
महाजने येथील उत्सवाने 60 वर्षाची परंपरा जपली आहे. यावर्षीदेखील हा उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी (दि.23) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उत्सवाला सुरुवात होणार आहे.गावातील ग्रामस्थ भालचंद्र घाणेकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. महाजने येथील श्री गजानन प्रासादिक संगीत भजन मंडळ, श्री गजानन वारकरी भजन मंडळ, वावे येथील श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, वळवली येथील श्री द्वारकाधीश प्रासादिक भजन मंडळ, बापळे येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वळवली येथील श्री गणेश प्रासादिक भजन मंडळांची भजने होणार आहेत. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रींची पालखी व मिरवणूक काढण्यात येणार आहे. खालूबाजा या पारंपारिक वाद्यांसह वारकरी भजने, बेंजो पथक तसेच लाठीकाठीचे सादरीकरण व प्रदर्शन होणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिध्दी पत्रकामार्फत दिली.