ग्रामीण महिलांना मिळणार मोठी बाजारपेठ
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी येथे 24 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, 24 मार्च रोजी उद्घाटन होणार आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात एकूण 490 स्टॉल्स उभारले जाणार असून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट आणि विविध उपक्रम सहभागी होणार आहेत. 70 स्टॉल्सचे भव्य खाद्यपदार्थ विभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे. यामध्ये राज्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांसह हातमाग वस्त्रे, लाकडी कलाकुसर, वारली कला, दागिने आणि हस्तकला वस्तू थेट ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
यंदा प्रदर्शनात ‘व्हिलेज एरिया’, आधुनिक छायाचित्रण सुविधा, माहिती फलक तसेच लहान मुलांसाठी विशेष खेळण्याची जागा उपलब्ध करण्यात आली आहे. संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी, असे आवाहन निलेश सागर यांनी केले आहे.






