| पेण | प्रतिनिधी |
तीनशे वर्षांपूर्वी माझ्या राजाने ज्या योजना राबविल्यात, त्या योजना आज शासनकर्ते राबवत आहेत. आज शासन वेगवेगळ्या योजना स्वतःच्या नावाने संपवत असले, तरी त्या योजना महाराजांच्या आहेत, हे आपल्याला या अंकातील लेखांवरुन प्रकर्षाने जाणवते, असे प्रतिपादन माजी जि.प. सदस्या अॅड. निलिमा पाटील यांनी केले. या अंकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती, अर्थनीती, युद्धनीती, उदात्त धार्मिक धोरण, व्यापारी धोरण यासारख्या अंतरंगावर प्रकाश टाकलेला असून, गर्जा रायगडचा वर्धापनदिन विशेष अंक अतिशय देखणा व माहितीपूर्ण आहे, असे गौरवोद्गारही पाटील यांनी काढले.
पेण येथून प्रकाशित होणार्या संपादक संतोष पाटील यांच्या साप्ताहिक गर्जा रायगडचा आठवा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी अॅड. निलीमा पाटील, पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, जीवन पाटील मुख्य अधिकारी, संगीता माने शिक्षण अधिकारी नगरपालिका पेण, देवेंद्र पोळ पोलीस निरीक्षक पेण, तानाजी नारनवर पोलीस निरीक्षक वडखळ, अॅड. मंगेश नेने युथ आयकॉन पेण, पेण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष, डी.बी. पाटील, माजी जि.प. सभापती, प्रभाकर म्हात्रे (हरिओम), अॅड. महेश देसले, समिर म्हात्रे कार्याध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, राजू पिचिका उद्योजक, दयानंद भगत राष्ट्रवादी अध्यक्ष, जगदीश ठाकूर पेण तालुकाप्रमुख शिवसेना, दिपश्री पोटफोडे संघटिका रायगड जिल्हा, संजय डंगर शेकाप तालुका चिटणीस, मिलिंद पाटील भाजप सरचिटणीस रायगड जिल्हा यांच्या हस्ते मृगज कुंभार (मूर्तीकार), आकाश घरडे (दुर्ग भ्रमंती), जीवन पाटील (समाजसेवा) यांना वैयक्तिक गर्जा रायगडरत्नाने, तर बींईग गुड फाऊंडेशन (रसायनी), गणेश उत्सव व श्री कृष्ण जन्माष्ठमी (पेण), अप्लाईड एनव्हायरल मेंटल रिसर्च फाऊंडेशन (कोकण) या संस्थांनादेखील गर्जा रायगडरत्न, तर उत्कृष्ट निवेदक सुभाष टेंबे यांना विशेष गर्जा रायगड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संपादक संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आज दुय्यमतेची वागणूक मिळत आहे यावर भाष्य करुन दगडाला देवपण देण्याचे काम पत्रकार करु शकतात, असे ठाम सांगून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वागताना सन्मानाने वागा, असे ठाणकावून सांगितले.
या वर्धापनाच्या कार्यक्रमामध्ये शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांचे शिवस्मूर्ती गायनाचा उत्तम कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच गर्जा रायगड साप्ताहिकामार्फत ईको फ्रेंडली गणपती आरास स्पर्धेच्या विजेत्यांनादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.