महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन – मुख्यमंत्री

| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणार्‍या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद शुक्रवारी( 8 जुलै) सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी सुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरुन ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणार्‍या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणार्‍या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री


फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच आमचे शासनसुध्दा येणार्‍या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळया शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करुन 2030 पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Exit mobile version