| पाली/सुधागड | प्रतिनिधी |
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील पालीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पाली येथे घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात बल्लाळेश्वर मंदिर परिसर, शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख कार्यालय व गोडावून परिसर, कृषी खाते व वन विभाग, बांधकाम विभाग व शासकीय विश्रामगृह, पंचायत समिती, पाली बाजारपेठ, श्री स्वामीसमर्थ नगर आणि एस टी स्टॅण्ड परिसर, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाली स्मशानभूमी रस्ता, आयटीआय व टेभी वसाहत, हटाळेश्वर चौक परिसर व शरफुद्दीन बाबा दर्गा परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता केली. सकाळी 8 वाजल्यापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. या अभियानात 830 श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन हातात ग्लोज, मास्क, झाडू, खुराल, पंजे यांचा वापर करून 17 हजार 827.5 चौ. मी परिसर आणि रस्ते 6.4 किमी स्वच्छता करून हे अभियान यशस्वी केले. या वेळी पालीतुन सुका कचरा 28.5 टन आणि ओला कचरा 13.2 टन जमा करून ट्रॅक्टर, टेम्पो यांच्या माध्यमातून डंपिंग मैदानात साठविण्यात आला.






