| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी शनिवारी (दि. 7) विधिमंडळात पार पडला. मात्र, महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करत शपथविधीवर बहिष्कार घातला. ‘मॉक पोल’ची घोषणा करणार्या मारकडवाडीत ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज शपथ घेणार नाही, असे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजच्या दिवसासाठी निषेध म्हणून शपथ घेतली नाही. बहुमताचे सरकार आल्यानंतर राज्यात जे वातावरण हवे, उत्साह हवा, जल्लोष हवा तसे कुठेही दिसत नाही. कुणीही हा विजय साजरा करत नाहीय. हे बहुमत जनतेने दिलेले आहे की निवडणूक आयोग, ईव्हीएमने दिलेले आहे? हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वांनीच मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाने निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले. हे जनतेच्या मनातील प्रश्न आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ‘मॉक पोल’ची तयारी केली होती. हे सर्व निवडणुकीनंतर होत होते. तिथून जिंकलेल्या उमेदवारानेही ‘मॉक पोल’ला पाठिंबा दिला होता. मॉक पोल जनतेच्या मनातील शंकांना उत्तर देणारा होता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
बॅलेट पेपरवर कोण जिंकू शकते, ईव्हीएमवर कोण, कसे जिंकू शकते, हे आम्ही अनेकदा दाखवले आहे. आम्ही पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या मतांमधील तफावतही दाखवली. पण, मारकडवाडीमध्ये फक्त कर्फ्युच नाही तर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून काही जणांना अटकही करण्यात आली. याचा निषेध म्हणून आम्ही शपथ घेतली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही हरलेलो उमेदवार नाहीत. आम्ही जिंकून आलेलो आहोत. तरी देखील आमच्या मनात ईव्हीएमबद्दल, निवडणूक आयोगाबद्दल शंका आहे. जनतेचा मान राखून त्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचा मान राखून शपथ घेत नाही आहोत.
लोकशाहीचा लॉन्ग मार्च आम्ही हाती घेत आहोत. 2014 पासून लोकशाही चिरडण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याविरोधात आम्ही हे पाऊल उचलले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
सामान्य माणसाला घाबरवून, दरडावून राज्य करता येते असा समज असेल तर सामान्य माणूस राज्य पलटवू शकतो हे दांडी मार्चने दाखवून दिले होते. स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा नवीन चालना देणारी ठरली, तसेच एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी मारकडवाडीचा प्रयोग आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल. नवीन दांडी मार्च मारकडवाडीच्या नावाने ओळखला जाईल.
– आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी पवार गट
लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे, ती देशात पोहोचवण्याचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल.
– नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष