जैन समुदायासाठी महावीर जयंती अत्यंत महत्त्वाची असते. हा दिवस ते जैन धर्माचे महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. ते शुक्ल पक्षामध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या दिवशी जन्मले होते. जैन धर्मातील महान तीर्थंकराचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती साजरी केली जाते. जैन लोक आनंद आणि उत्साहात हा दिवस साजरा करतात. ते जैन मंदिराला भेट देऊन त्यांच्या समुदायासाठी भगवान महावीर यांनी केलेल्या योगदानाचे स्मरण करतात आणि त्यांची शिकवण नव्या पिढीला शिकवतात.
कर्जतमध्ये महावीर जयंती साजरी
| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत शहरांतील जैन बांधवांनी महावीर जयंती उत्साहात साजरी केली. यानिमित्ताने महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. यावेळी जैन बांधवांनी जिओ और जिने दोच्या घोषणांनी कर्जत शहर दणाणून सोडले होते. जैन साध्वींसह जैन बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. जैन मंदिरापासून निघालेली मिरवणूक बाजारपेठेतून लोकमान्य टिळक चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून छत्री केंद्र मार्गे पुन्हा जैन मंदिराकडे आली. जैन बांधवानी व खास करून लहान मुलांनी नाचून मिरवणुकीची शोभा वाढवली. या मिरवणुकीत घोडे सुद्धा सहभागी करण्यात आले होते.
याप्रसंगी अशोक ओसवाल, जितेंद्र ओसवाल, नितीन परमार, जयंतीलाल परमार, रणजित जैन, दिनेश जैन, मोहन ओसवाल, मदन परमार, पंकज ओसवाल, साजन ओसवाल, मंगल परमार, अरविंद जैन, छगन ओसवाल, रमेश ओसवाल, जितेंद्र परमार, वालचंद ओसवाल, राजेश सोलंकी, डॉ. प्रेमचंद जैन, राजेश ओसवाल आदींसह बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नेरळमध्ये मिरवणुक
| नेरळ । वार्ताहर ।
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत आणि नेरळ शहरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची रथामधून मिरवणुक काढण्यात आली. भगवान महावीर जयंतीसाठी कर्जत आणि नेरळ येथील जैन धर्मीय यांनी आपली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवला होता. मंगळवारी सकाळी नेरळ बाजारपेठ मधील महावीर चौकात असलेल्या जैन मंदिर येथून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुक निघाली. यावेळी राठामधून सारथ्य करण्याचा मान शहरातील सुरेश शहा यांच्या कुटुंबाला मिळाला होता.

भगवान महावीर यांच्या प्रतिमेजवळ शहा कुटुंब सहभागी झाले होते. जैन मंदिर येथून निघालेली मिरवणुक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रेल्वे स्टेशन कडे गेली. तेथून बाजारपेठ मधून हुतात्मा हिराजी पाटील चौकातून लोकमान्य टिळक वाचनालय अशी ब्राम्हण आळी येथिल जैन मंदिर येथे पोहचली. नेरळ मधील महावीर जयंतीची मिरवणुक पूज्य साध्वी श्रीमुक्तीमैत्री श्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
मुरुडमध्ये विविध कार्यक्रम
| मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड शहरामध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक दिन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान महावीरांची प्रतिमा सुवर्ण रथात विराजमान करण्यात येऊन भव्य मिरवणूक संपूर्ण मुरुड शहरात फिरवण्यात आली.

यावेळी जैन समाजाच्या महिला व पुरुष व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या उत्सहात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मुरुड शहरातील भगवान महावीर मंदिरात अभिषेक कार्यक्रम, पूजा व भक्ती संध्या आरती असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. सदरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन जैन समाज अध्यक्ष हसमुख जैन, छगनलाल जैन, सुरेश जैन, गौतम जैन, सचिन शहा, अमित जैन यानी केले होते.
पालीत सद्भावना रॅली

वर्धमान महावीर जयंतीनिमित्त पाली सुधागड या तालुक्याच्या ठिकाणी सद्भावना रॅली काढण्यात आली. यानिमित्ताने जैन मुनींचे शुभआशीर्वाद देखील घेतले. महावीर जयंतीनिमित्त निघणारी रॅली यावर्षी उत्स्फूर्तपणे निघाली होती.
श्रीवर्धनमध्ये मिरवणूक

श्रीवर्धनमध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त श्रीवर्धन येथील जैन मंदिरापासून वाद्यांच्या नगरात मिरवणूक निघाली होती.
माणगावात शोभायात्रा

माणगावात जैन बांधवांनी भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी केली. या जयंती निमित्त माणगाव बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेले जैन बांधव- भगिनी दिसत आहेत.
भव्य दिव्य मिरवणूक

महावीर जयंती निमित्त नवीन पनवेल येथील जैन मंदिरातून भगवान् जैन बांधवांनी भव्य दिव्य मिरवणूक काढली. यावेळी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मिरवणुकी मध्ये मोठा सहभाग घेतला होता.