चार महिन्यांत 19,599 प्रकरणे उघड; कोकण विभाग आघाडीवर
| पुणे | प्रतिनिधी |
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या धडक तपासणी मोहिमेत गेल्या चार महिन्यांत तब्बल 19 हजार 599 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी 6 हजार 629 वीजचोरांकडून 14 कोटी 12 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वीजचोरीच्या प्रकरणांत कोकण विभाग सर्वाधिक आघाडीवर असून, या विभागात 7 हजार 496 प्रकरणे समोर आली आहेत.
महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत एप्रिल ते जूनदरम्यान 8 हजार 567 वीजचोरीची प्रकरणे आढळली. त्यानंतर केवळ जुलै महिन्यातच तब्बल 11 हजार 32 वीजचोऱ्या उघडकीस आल्याने कारवाईला अधिक वेग आला आहे.
गेल्या चार महिन्यांत आढळलेल्या वीजचोरीच्या 15 हजार 965 प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, संबंधित ग्राहकांना तब्बल 30 कोटी 36 लाख रुपयांची वीजचोरीची देयके देण्यात आली आहेत. उर्वरित 3 हजार 634 प्रकरणांचे मूल्यांकन सुरू आहे. याशिवाय 4 हजार 959 प्रकरणांत 1 कोटी 85 लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
महावितरणने थकबाकीदारांनाही इशारा दिला आहे. वीजचोरीची संपूर्ण रक्कम आणि दंड न भरल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांचीही तपासणी सुरू असून, संबंधितांनी अन्य ठिकाणाहून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्यास त्यांच्यावर वीजचोरीची कारवाई केली जाणार आहे.
चार महिन्यांतील वीजचोरीची विभागनिहाय आकडेवारी
कोकण : 7,496
छत्रपती संभाजीनगर : 4,597
नागपूर : 4,521
पुणे : 2,985
एकूण : 19,599
जुलै महिन्यातील वीजचोरी
कोकण : 4,084
छत्रपती संभाजीनगर : 2,365
नागपूर : 2,324
पुणे : 2,259
एकूण : 11,032






