| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कोलाड-रोहा मार्गावरील आंबेवाडी नाका येथील गांधी हॉस्पिटलच्या समोर असलेल्या जीर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे उपचारासाठी गांधी हॉस्पिटलमध्ये येणार्या जाणार्या रुग्णांसह ये-जा करणार्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून याकडे महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. या पोलावर असंख्य विद्युत वाहक तारा एकमेकांच्यात गुंतलेल्या आहेत. या विद्युत वाहक पोलाची अवस्था पाहता या तारा कधीही खाली येऊ शकतात व यामुळे गांधी हॉस्पिटलमध्ये येणार्या रुग्णांच्या तसेच या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
गांधी हॉस्पिटलमध्ये दर बुधवारी कोलाड रोहा लायन्स क्लब तर्फे नेत्र तपासणी शिबीर असते. शिवाय या परिसरात छोटे मोठे अपघात होत असतात, लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यत विविध आजरावर उपचार करण्यासाठी, तसेच हाडांचे तज्ञ डॉक्टर, दंत चिकित्सा, विविध प्रकारच्या आजावरील तज्ञ डॉक्टर येतात यामुळे या हॉस्पिटल मध्ये विविध प्रकारचे उपचारासाठी असंख्य नागरिक ये-जा करीत असतात. यामुळे जीर्ण झालेल्या विद्युत पोलावरून विद्युत वाहक तार पडली तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
याविषयी डॉ.गांधी यांनी महावितरण कंपनीकडे दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. याचवेळी महावितरण कंपनीने जीर्ण झालेल्या पोलाच्या बाजूला नवीन पोल बसविला आहे. परंतु दोन वर्षापासुन त्या पोलावर विद्युत वाहक तारा जोडल्या गेल्या नाहीत.तर एखादी घटना घडण्याच्या आत या विद्युत तारा नवीन विद्युत पोलावर बसवाव्यात अशी मागणी डॉ. गांधी व सदरील रहिवाशी यांच्याकडून केली जात आहे.