महाराष्ट्र केसरीत महेंद्र, बाळूची विजयी सलामी

| वाघोली | प्रतिनिधी |

68 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत गुरुवारी नेत्रदीपक लढती झाल्या. बाहुबली अशी ओळख असलेल्या महेंद्र गायकवाड, अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने नेत्रदीपक विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बाळू बोडकेने माऊली जमदाडे याचा पराभव केला. महाराष्ट्र केसरी गटातील पहिल्या फेरीतील या लढती उत्कंठावर्धक झाल्या. महेंद्र गायकवाड (सोलापूर) विरुद्ध विशाल बनकर (सोलापूर) यांची पहिली लढत झाली. सुरुवातीलाच महेंद्रने आक्रमक खेळ करीत एकेरी पटाची पकड करीत दोन गुणांची कमाई केली. प्रारंभी दोघांमध्ये खडाखडी होती. विशाल टांग डावात पटाईत आहे. पहिल्या फेरीअखेर 0-2 असा गुणफलक होता. महेंद्रने दोन गुणांची आघाडी घेतली होती. त्याने हप्ता डाव टाकून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यात दोन गुण घेतले; मात्र या झटापटीत महेंद्रच्या डोळ्यात माती गेल्याने रक्तस्राव झाला, त्यामुळे डॉक्टरांना मैदानात पाचारण करावे लागले. विशाल आक्रमक झाला; परंतु महेंद्रने पुन्हा ताबा मिळवत दोन गुण घेतले. त्यामुळे महेंद्रकडे सहा गुणांची भरभक्कम आघाडी झाली. महेंद्रच्या नकारात्मक कुस्तीचा विशालला एक गुण बहाल करण्यात आला. त्यामुळे या कुस्तीत महेंद्रने पाच विरुद्ध एक असा एकतर्फी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरी लढत ज्ञानेश्वर जमदाडे (अमरावती) विरुद्ध बाळू बोडके (नाशिक) यांच्यात झाली. त्यात भारंदाज डावाने जमदाडे याने चार गुण घेतले. त्या अगोदर बाळूने दोन गुण घेतले होते. पुन्हा जमदाडेने एक गुण घेतला. बाळूने चपळाईने आक्रमक होत दोन गुण घेतले; मात्र त्याला चॅलेंज झाले; मात्र ते फेटाळले गेले. त्यामुळे आणखी गुण बहाल केला. परिणामी, त्यांच्यात बरोबरी झाली. बाळूने आक्रमण चालूच ठेवले. स्टेपआऊट झाल्याने बाळूला गुण मिळाला. माउली पाच विरुद्ध सहा असा पिछाडीवर पडला. बाळूने ताबा मिळवत दोन गुण घेत आठ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. माउली आक्रमक होत पटाला गेला; मात्र त्याचे आक्रमण धुडकावून बाळूने ताबा मिळवत दोन गुण घेतले. एकंदरीत दहा गुण घेत विजय मिळवला.

Exit mobile version