अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार महेश बालदी यांनी आगरी समाजाबद्दल अपमानजन्य वक्तव्य केले होते. यामुळे आगरी समाजाचा घोर अपमान झाला असून बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने बालदी यांना पत्राद्वारे केला आहे. यापूर्वी अखिल आगरी समाज परिषद यांनी देखील महेश बालदी यांनी आगरी समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली होती.
काही दिवसांपुर्वी महेश बालदी यांनी ‘माझी जात बघायला, तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी’ अशी वायफळ बडबड करुन येथील माता-भगिनींचा अपमान केला होता. येथील आयाबहिणी काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. हे आपण ध्यानात घ्यावे. असा सूचक इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने दिला आहे. तसेच, एकीकडे स्थानिक भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करीत असून यासाठी अनेक आंदोलने देखील केली जात आहेत. आणि दुसरीकडे विद्यमान आमदार जाणीवपुर्वक या विमानतळाचा उल्लेख आदाणी विमानतळ असा करुन स्थानिकांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. अशा प्रकारे अनेक विधानांतून महेश बालदी यांनी आगरी समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल बालदी यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. समाजाबद्दलचे असे अनुद्गार यापुढे आम्ही कदापि खपवून घेणार नसल्याचे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने मागणी केली आहे.