। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन आणि संयोजन करण्यासाठी पनवेल येथील काँग्रेस भवनमध्ये गुरूवारी (दि.7) महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न झाला.
यावेळी पनवेल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, कॅप्टन कलावत, आर.सी. घरत, जी.आर पाटील, नंदराज मुंगाजी, श्रुती म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भावना घाणेकर, सतीश पाटील, काशिनाथ पाटील, आरपीआयचे उत्तम गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन स्वाभिमानीचे महेश साळुंखे, समाजवादी पार्टीचे दिनेश यादव, आर.सी. यादव, अनिल नाईक, सुभाष गायकवाड, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे एकनाथ मात्रे, विश्वास पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडी आता पूर्णपणे एकदिलाने व एकत्रितपणे प्रचारात उतरली असून आज शिट्टीचा विजय निश्चित झाल्याचे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले. तसेच, ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये आमचे थोडेफार मतभेद असले तरी वरिष्ठ पातळीवर हे मतभेद मिटविले जातील आणि शिट्टी विजयी होईल, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तर, यावेळी सुदाम पाटील यांनी बोलताना सांगीतले की, आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उध्दव ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष व सर्व मित्र पक्ष एकत्रितपणे कामाला लागलो असून आमच्यातले हेवेदावे मिटले आहेत. तसेच, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे हा निर्धार केला असून या माध्यमातून प्रचारात सक्रीय झालो असल्याचे त्यांनी सांगितले.