| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरून पुई गावाजवळून जाणारी महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, या नदीचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गोवे गावाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तसेच, येथील सर्व भातजमीन पाण्याखाली गेली असून, नदीकाठच्या गावाला सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गेले दोन ते तीन दिवस सतत पडत असेलेल्या मुसळधार पावसामुळे कोलाड परिसतील महिसदरा, कुंडलिका व गोदी नदी दुधडी भरून वाहत आहेत. या तिन्ही नदींनी धोक्याची पातळी ओलांडली असुन, गोवे गावाला पाण्याचा वेढा घातला आहे. त्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर आले असून, येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला झाला आहे. त्यामुळे धाटाव एमआयडीसीमध्ये कामावर जाणारे कामगार तसेच कोलाड बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागले. तर, आंबेवाडी येथील समर्थ नगर येथे पूर स्थिती निर्माण झाली आहे.







