नगरपंचायत प्रशासन मात्र गप्प; भाविकांसह नागरिकांचे हाल
| राबगाव/पाली | वार्ताहर |
शहराच्या दोन मुख्य रस्त्यांचे काम 21 नोहेंबरला कंत्राटदारांकडून सुरू करण्यात आले होते. परंतु, मागील चार ते पाच दिवसांपासून कंत्राटदारांकडून काम अचानक बंद करण्यात आल्यामुळे पालीकरांना काहीच कळेना की रस्त्याचे काम होणार आहे की परत धूळयुक्त रस्त्याची धूळ पालीकरांच्या नशिबी येणार आहे.
मागील अनेक महिन्यांपासून पालीकर खराब आणि धुळीच्या रस्त्यांमुळे त्रस्त आहेत. काम बंद केल्यामुळे जो रस्ता 10 दिवसांत पूर्ण व्हायला हवा होता, त्याचे 1 इंचाचेदेखील काम झाले नाही. त्यामुळे या दिरंगाईला जबाबदार कोण, अशी चर्चा पालीत सुरू आहे. याबाबतीत अधिक माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, पालीतील रस्ता करताना मोर्यांचे काम चालू केल्यामुळे काही नागरिकांनी तक्रारी केल्या, त्यामुळे सदरचे काम थांबवण्यात आले होते. असे जरी असले तरी पाली नगरपंचायत प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील संघर्षामुळे सदरचे काम बंद ठेवण्यात आले होते, अशी दबक्या स्वरात चर्चा पालीत ऐकू येत आहे. सदरचा रस्ता बंद असल्यामुळे पालीतील जुन्या पोलीस स्टेशनच्या रस्त्यातून पालीकरांना आणि भाविकांना खराब रस्त्यातून आणि पर्यायी अत्यंत छोट्या रस्त्यातून जावे लागत असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.
मागील 15 ते 20 दिवस सुरू असलेले पालीतील मध्यवर्ती रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रकरणाची माहिती घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार आणि अभियंता यांना दिलेल्या आहेत, असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी येरुणकर यांनी सांगितलं. काही नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे कंत्राटदार यांनी काम बंद केलेले होते, परंतु त्यांना तात्काळ काम चालू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे कनिष्ठ अभियंता मोरखांडीकर यांनी सांगितले.