। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील खोपोली, ढेकू, पाताळगंगा, इसांबे आणि रसायनीसह अनेक भागांमध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. मात्र, याच औद्योगिक प्रगतीसह वाहतुकीचे प्रश्न अधिक तीव्र होत असून, जड व अवजड वाहनांचे अनियंत्रित पार्किंग ही मोठी समस्या बनली आहे. मुख्य वाहतुकीचे रस्ते पार्किंग यार्डसारखे दिसू लागले असून, स्थानिक नागरिकांसाठी हे जीवघेणे ठरत आहे.
सावरोली ते इसांबे फाटा, इसांबे ते लोहोप, लोहोप ते पाताळगंगा आणि ढेकू ते आत्करगाव या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, मोठ्या कारखान्यांमुळे अवजड वाहने या मार्गांवर अनियंत्रितपणे पार्क केली जात आहेत. अरुंद रस्ते, भरधाव वेगाने जाणारी वाहने आणि चुकीच्या ठिकाणी उभी राहणारी ट्रक, ट्रेलर, कंटेनर यामुळे अपघातांच्या घटना घडण्याची शक्यता दाट आहे. रसायनी परिसरातील रिलायन्स, बॉम्बे डाईंग, सिप्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी स्वतःच्या वाहनांसाठी खासगी पार्किंग व्यवस्था असतानाही मुख्य रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी यामुळे त्रस्त असून, वाहतूक नियंत्रण विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.
औद्योगिक वसाहतींमध्ये अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षा ही प्राथमिकता असायला हवी. मात्र, रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग करून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण केली जात आहे. नुकतेच देशभर राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला, परंतु उद्योग समूह आणि सुरक्षा अधिकार्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून घेतली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अवैध पार्किंगमुळे होणार्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.