भीषण अपघात! दोन कारच्या धडकेत 2 चिमुकल्यांसह सातजण जखमी

। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळ गुरुवारी (दि.4) दुपारी 12.15 चे सुमारास भीषण अपघात झाला. गुजरातहून रत्नागिरीकडे जाणारी बलेनो कार व कुसगावहून महाडकडे येणारी आय 20 कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये 2 लहान मुलांसह सातजण जखमी झाले.अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रसंगावधान राखून पोलिसांच्या मदतीने जखमींना ताबडतोब महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

गुजरातहून रत्नागिरीकडे जाणारी बलेनो कार क्र. जीजे 03 एक्सएल 8625 व कुसगांवहून महाडकडे येणारी कार यांची समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात आय 20 कारमधील सुधीर गोविंद ताठरे, सनी सुधीर ताठरे, प्रांजल सनी ताठरे सर्व राहणार कुसगाव महाड तर बलेनो कारमधील जगदीश विलास परेलकर, वेदा जगदीश परेलकर, पूर्वा जगदीश परेलकर, अद्विक जगदीश परेलकर सर्व राहणार गुजरात (मूळ गाव टेंबवली ता.देवगड, सिंधुदुर्ग) हे जखमी झाले.

सर्वांवर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Exit mobile version