अपेक्षांच्या मनधरणीसाठी प्रमुख उमेदवारांची दमछाक

रायगड जिल्ह्यातील 7 मतदारसंघात तब्बल 80 इच्छुक अपक्ष मैदानात

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती, शेतकरी कामगार पक्ष , वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांशिवाय तब्बल 80 इच्छुक अपक्ष मैदानात आहेत. त्यांची मनधरणी करून आपल्या विजयातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न प्रमुख उमेदवारांकडून सुरु आहे. त्यासाठी त्यांची दमछाक होत असल्याची स्थिती आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी, बहुजन समाज पार्टी, बळीराज सेना अशा विविध पक्षांचे उमेदवार उभे आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारांची संख्याही खूप मोठी आहे. महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवारांनी आपली मते ज्या अपक्ष उमेदवाराला पडू शकतात व त्यामुळे आपल्या विजयासाठी त्याची उमेदवारी अडचणीची ठरू शकते. त्यांची मनधरणी करायला सुरवात केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत त्यांना अर्ज माघार घेण्यासाठी विनंती करणे सुरु आहे. याशिवाय त्यांच्या गाठीभेटीदेखील वाढल्या असून जे उमेदवार आपल्या सांगण्यावरून अर्ज मागे घेवू शकत नाही, त्यांना त्यांच्याच जवळील व्यक्तीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता 4 नोव्हेंबरपर्यंत 94 उमेदवारांपैकी कितीजण आपला अर्ज मागे घेतात आणि निवडणुकीला प्रत्यक्षात किती उमेदवार सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Exit mobile version