| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामांना पुरेसी गती नसल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 103 गावांमध्ये जलजीवनच्या योजनेचे काम पुर्ण झाले असून 600 योजना 50 टक्के पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित गावांच्या योजना प्राथमिक टप्प्यात आहेत. त्यामुळे मुदतीत ही कामे पुर्ण करून गती देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी मिळावे,यासाठी जलजीवन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली. 2021- 2022 पासून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली. जिल्ह्यात 1831 महसूली गावे असून 1422 गावांमध्ये पाण्याची योजना नसल्याने जलजीवन योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत बृहद आराखडा तयार करण्यात आला. त्यात जुन्या योजना अपग्रेड करण्यास देखील सुरुवात केली. त्यामध्ये पाण्याच्या टाकीचा आकार वाढविणे. पाईप लाईन टाकणे अशा 688 योजना अपग्रेड करण्याची मोहीम सुरु केली. ज्या गावात नवीन योजना राबविली नाही, अशा 734 गावांमध्ये नवीन योजना सुरु केली. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार फक्त 10 टक्के जलजीवनची कामे शंभर टक्के पुर्ण झाल्याचे समोर येत आहे. 50 टक्के पूर्ण झालेली कामे शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी दोन महिन्यात लक्षांक ठेवण्याचा नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. उर्वरित योजनांचे कामे डिसेंबर अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
योजना पूर्णत्वासाठी बैठका
जलजीवन योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर बैठका सुरु केल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या बैठका सुरु झाल्या आहेत. सुरुवातील अलिबाग तालुक्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 105 योजनांची माहिती घेण्यात आली. त्यात नऊ कामे पुर्ण झाली असून 92 कामे प्रगतीपथावर आहेत. यातील 30 कामे येत्या दोन महिन्यात पुर्ण केल्या जाणार आहेत. सुरु न झालेली 4 कामे आहेत. जलजीवनच्या कामांना चालना देण्यासाठी ठेेकेदार, सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन जलजीवन योजना पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
जलजीवन योजनेअंतर्गत अपूर्ण असलेल्या कामांना गती देण्यासाठी तालुकास्तरावर बैठका सुरु केल्या आहेत. त्याचे नियोजन केले आहे. या बैठकींच्या माध्यमातून गावांमधील जलजीवनचे प्रश्न मार्गी लावून सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद