नागाव परिसरातील घरांना मोठे हादरे; काचा फुटल्या, अनेकांचे नुकसान
। उरण । प्रतिनिधी ।
उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्प परिसरात सोमवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले. परिसरातील नागावसह अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड हादरे बसले, इतकेच नव्हे तर घरांच्या काचा फुटून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. गॅस पाईपलाईन गरम झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की, संपूर्ण परिसर दणाणून गेला. काही काळ स्थानिक नागरिकांना मोठ्या आपत्तीचेच संकट ओढवले असल्याची भीती वाटू लागली. दूरवरूनही उठणारा काळा धूर व प्रचंड ज्वाळा पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी ओएनजीसीचे अग्निशमन पथक तसेच संकट व्यवस्थापन टीम तात्काळ दाखल झाली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र नागरिकांच्या घरांना व मालमत्तेला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, आग आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. सुरक्षा कारणास्तव गॅस पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून, परिस्थिती स्थिर करण्यासाठी प्रशासन व कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकार्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वारंवार घडणार्या गॅस गळती, स्फोट आणि आगीमुळे उरण व परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रहिवाशांनी या दुर्घटनेबाबत सखोल व पारदर्शक चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तातडीने सुरक्षा सुधारणा कराव्यात आणि किनारी पट्ट्यासाठी आपत्कालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अग्निशमन पथक तसेच संकट व्यवस्थापन टीम तात्काळ दाखल झाली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग वेळीच आटोक्यात आल्याने फार मोठा अनर्थ टळला.







