। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वेणगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी यांनी बहुमताच्या जोरावर अध्यक्ष-उपाध्यक्षपदे मिळविली आहेत. सोसायटीवर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव नारायण मोडक यांची बिनविरोध, तर उपाध्यक्षपदावर शेकापचे दीपक धुळे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविले.
वेणगाव गौरकामत विविध विकास कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव नारायण मोडक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी मोडक यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्षपदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे दीपक धुळे आणि शिवसेनेकडून अजित पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. दोन उमेदवार रिंगणात असल्याने मतदान घेण्यात आले.शिवसेनेचे संचालक अजित पाटील यांना तीन, तर दीपक धुळे यांना नऊ मते मिळाली. त्यामुळे उपाध्यक्ष म्हणून धुळे यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी ज्येष्ठ नेते विलास थोरवे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, माजी सरपंच शंकर भुसारी, तसेच बळीराम देशमुख, किरण थोरवे, दीपक भुसारी, माजी सरपंच बाळू थोरवे, विनय वेखंडे, शशिकांत देशमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे या सोसायटीवर अनेक वर्षे वर्चस्व असून, शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय अंगलट आला असल्याचे दिसून आला.