नागपूरच्या मुलीचा चीनमध्ये डंका

ऑलिम्पिक विजेती जॉर्जियाचा पराभव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

नागपूरच्या 22 वर्षीय मालविका बनसोड हिने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी (दि.18) धक्कादायक निकाल नोंदवला आहे. मालविकाने पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या जॉर्जिया तुंजंगचा 26-24, 21-19 असा धक्कादायक पराभव केला आहे. तसेच, मालविकाचा हा कारकीर्दितील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरलेला आहे.

मालविका बनसोडेने मालदिव व नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत. शिवाय तिने राष्ट्रीय स्तरावरील अनेक ज्युनियर व सिनियर स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकली आहेत. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली होती. तिने 13 वर्षांखालील व 17 वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 2018 मध्ये तिला आशियाई ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयशी झाल्यानंतर तिने सलग दोन निवड चाचणी स्पर्धा जिंकल्या आणि जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली होती.

डिसेंबर 2018 मध्ये मालविकाने दक्षिण आशिया विभागातील 21 वर्षांखालील स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. वैयक्तिक व सांघिक अशी दोन्ही जेतेपदं तिने या स्पर्धेत आपल्या नावावर केली होती. 2019 मध्ये तिने ऑल इंडिया सीनियर रँकिंग आणि ऑल इंडिया ज्युनियर रँकिंग स्पर्धा जिंकली. त्याचवर्षी तिने बल्गेयियन ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तसेच, 2022 मध्ये इंडिया ओपन स्पर्धेत तिने सायना नेहवालला पराभूत करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. यावेळी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पीव्ही सिंधूने तिला पराभूत करून जेतेपद पटकावले होते.

Exit mobile version