हिवाळेत कारवाई; नदी काठावरच प्रकार
| आचरा | प्रतिनिधी |
स्फोटक पदार्थांच्या साहाय्याने मानवी जीवितास धोका पोहोचवण्याच्या आणि मालमत्तेची हानी करण्याच्या उद्देशाने जिवंत गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी आचरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित प्रकाश परब (67), रा. हिवाळे खालची परबवाडी, ता. मालवण यांना शुक्रवारी (दि.6) पहाटे ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही घटना गुरुवारी (दि.5) सायंकाळी सातच्या सुमारास कसाल नदीच्या किनारी, हिवाळे-परबवाडी येथे घडली. येथे गावठी बॉम्ब आढळून आले. या प्रकरणाची माहिती हिवाळे गावचे पोलिसपाटील वीरेंद्र कदम (54) रा. हिवाळे बौद्धवाडी यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, मालवण पोलीस निरीक्षक जगताप, साहाय्यक पोलीस निरीक्षक माने, उपनिरीक्षक टेंबूलकर, गाडेकर, साटम आदी अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन जिवंत गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. अधिक सुरक्षिततेसाठी बॉम्बशोध व नाशक पथकास पाचारण केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक टेंबूलकर करत आहेत.
