पत्नीला जिवंत जाळणाऱ्याला जन्मठेप

| माणगाव | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील ढालकाठी परिसरातील निशा दिपक झांजे (28) यांना त्यांच्या पतीने दि.31 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्याच राहत्या घरी अंगावर पेट्रोल टाकुन आग लावुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, निशा झांजे या मुंबईतील कस्तुरबा हॉस्पीटल येथे उपचार घेत असताना त्यांचा दि.6 जानेवारी, 2022 रोजी मृत्यू झाला. आरोपी पतीचे नाव दिपक अशोक झांजे (36) असे असून, त्याच्यावर गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयात पार पडली. या खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासले. सर्व बाबींचा विचार करून व उपलब्ध पुराव्यावरून बुधवारी (दि.20) जिल्हा न्यायाधीश तथा अति. सत्र न्यायाधिश एस.टी भालेराव यांनी या प्रकरणात दिपक झांजे यांना दोषी धरून जन्मठेप व दंड रक्कम रूपये 4 हजार न भरल्यास 4 महिने सक्तमजुरी, अशा शिक्षेचा हुकूम मा. न्यायालयाने केला आहे.

Exit mobile version