मनाली करणची उत्कृष्ट कामगिरी

अभिनयानंतर पत्रकारिता क्षेत्रात पाऊल; प्रथम श्रेणी पटकावून घवघवीत यश

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील तेलंगे गावची तरुणी मनाली करण हिने पत्रकारिता क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मे महिन्याच्या अंतिम परीक्षेत थेट प्रथम श्रेणी पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. दर्जेदार पत्रकार घडवणाऱ्या नाशिक येथील भारत सरकार मान्यता प्राप्त, नीती आयोग व जिल्हा निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार अकॅडमी”चा वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. त्यात मनालीने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कृतिका मराठे यांच्या हस्ते व स्वाक्षरीने तिला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पत्रकारितेत पाऊल ठेवण्यापूर्वी मनालीने सांस्कृतिक आणि रंगभूमीच्या क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून पुढे येत असलेल्या या तरुणीच्या याचे कौतुक सध्या सर्वत्र केले जात आहे. यापूर्वी तिने “लढा”, “मेलो डोलो मारून गेलो”, “आता हो म्हण”, “निर्णय”, “कोकणचा पोरं” आणि “एकलव्य” अशा विविध नाटकांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. तसेच, “कोकणची राधा नमन” आणि “पी.टी. केस” या शॉर्ट फिल्म्समध्येही तिने चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय राहिलेल्या मनालीने पत्रकारिता क्षेत्रात काम करत असतानाच, या क्षेत्राची अधिकृत पदविका प्राप्त करावी, असा खंबीर निर्णय घेतला होता.

या तरुणीने कला आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांसह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ग्रामीण भागातील तरुणीने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश खेचून आणल्यामुळे तिचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून, राजकीय नेत्यांकडून आणि हितचिंतकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कला असो वा पत्रकारिता, समाजाचे वास्तव मांडणे हेच माझे ध्येय आहे. एक लेखणीधारकरूपे समाजातील अन्यायाविरुद्ध सडेतोड आसूड ओढणे, तसेच ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब, सामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते न्याय्य पातळीवर सोडवणे हाच माझा मुख्य उद्देश आहे. तळागाळातील नागरिकांचा बुलंद आवाज बनून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.

मनाली करण
Exit mobile version