| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दुचाकी अपघातातील जखमींच्या मदतीला शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे धावून आल्या. त्यांनी त्यांच्या गाडीतून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गाडीची व्यवस्थादेखील करून दिली. जखमी झालेली व्यक्ती मदतीसाठी हात करीत होते. परंतु कोणीही मदत केली नाही. मात्र मानसी म्हात्रे यांनी केलेल्या मदतीमुळे माणूकीचे दर्शन घडून आले. रात्रीच्या सुमारास घडलेल्या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
पेण-अलिबाग मार्गावरून प्रवास करीत असताना रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहाबाज जवळ आल्यावर खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यातही परिस्थितीत जखमी मदतीसाठी हात करीत होते. ही बाब शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या निदर्शनास आली. त्यांची गाडी बाजूला थांबवून माणुसकी दाखवत त्या जखमींच्या मदतीला धावून गेल्या. आपल्या गाडीमध्ये जखमींना बसवून पेझारी येथे सरकारी दवाखान्यात आणले. त्यांच्यावर उपचार होईपर्यंत थांबल्या. उपचार झालेल्या जखमींना त्यांच्या उरण या गावी वाहनाने पाठविण्याची सोय शेकापचे अनिल पाटील यांच्या मदतीने केली.







