माणगाव क्रीडा संकुल भग्नावस्थेत

खेळाडूंच्या स्वप्नांवर उदासीनतेची धूळ

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील क्रीडा विकासाचा कणा मानले जाणारे माणगाव क्रीडा संकुल आज अक्षरशः भग्नावस्थेत गेले असून, येथील खेळाडूंमध्ये तीव्र असंतोषाची भावना पसरली आहे. कधीकाळी खेळाडूंच्या सरावाने गजबजलेले हे संकुल आज दुर्लक्ष, उदासीनता आणि निष्क्रियतेचे प्रतीक बनले आहे. संकुलातील खेळांचे व व्यायामाचे साहित्य मोडकळीस आले असून, काही साहित्य अडगळीत तर काही थेट भंगारात पडले आहे. परिणामी,नव्या साहित्याच्या प्रतीक्षेत असलेले खेळाडू आजही रिकाम्या हाताने सराव करत आहेत.

क्रीडा संकुलाची इमारत ठिकठिकाणी तडकलेली, गळती लागलेली व असुरक्षित अवस्थेत दिसून येत आहे. पावसाळ्यात छतामधून पाणी गळत असल्याने आतील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. संकुलाला संरक्षण भिंत नसल्यामुळे मौल्यवान क्रीडा साहित्य चोरीला गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शासनाकडून कोणतीही नियमित देखभाल, दुरुस्ती किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने हे संकुल अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन 2004 साली झाले होते, तर उद्घाटन 2009 मध्ये तत्कालीन मंत्री व सध्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्राच्या विकासाची मोठी स्वप्ने दाखवून उभारण्यात आलेले हे संकुल मात्र उद्घाटनानंतर हळूहळू दुर्लक्षित होत गेले. विशेष म्हणजे, या संकुलासाठी धवलारकर या दानशूर व्यक्तीने शासनाला जमीन दान दिली होती. मात्र, आज त्याच जागेवर उभे असलेले संकुल खेळाडूंना उपयोगी पडत नसल्याने दानशूर दात्याच्या योगदानालाही अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मध्यंतरी कोकण विभागीय क्रीडा संकुल माणगाव येथे मंजूर केल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही घोषणा आजतागायत हवेतच विरून गेली असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे खेळाडूंच्या अपेक्षांचा भंग झाला असून, शासन केवळ घोषणा करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे.


खेळाडूंची घुसमट

माणगाव व परिसरातील अनेक खेळाडू आजही राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र, हे यश त्यांनी क्रीडा संकुल, आधुनिक सुविधा किंवा प्रशिक्षकांशिवाय, केवळ स्वतःच्या जिद्दीतून मिळवले आहे. पुरेशा मैदानांचा अभाव, सरावासाठी साधनसामग्री नसणे आणि स्पर्धांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक खेळाडू मोठ्या स्पर्धांपासून वंचित राहत आहेत. परिणामी, त्यांच्या करिअरच्या संधी मर्यादित होत असून क्रीडा क्षेत्रातील स्थानिक प्रतिभा दडपली जात आहे.
शासनाच्या उदासीनतेवर संताप

एकंदरीत शासन खेळ आणि खेळाडूंकडे गंभीरपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. यामुळे खेळाडूंचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असून, क्रीडा विकासाची प्रक्रिया मागे पडत आहे. माणगाव क्रीडा संकुलाची तातडीने दुरुस्ती, नवीन क्रीडा साहित्याची उपलब्धता, सुरक्षा भिंत, प्रशिक्षकांची नेमणूक व नियमित देखभाल यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने लक्ष घालून क्रीडा संकुल पुनर्जीवित करावे व माणगावच्या खेळाडूंना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, माणगावमधील अनेक होतकरू खेळाडूंची स्वप्ने या भग्न संकुलासोबतच कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
Exit mobile version