जम्मू ते कन्याकुमारी अंतर दुचाकीवर पार; 4000 किमींचा धाडसी सोलो प्रवास
| माणगाव | प्रतिनिधी |
भारताच्या उत्तरेकडील हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेच्या अथांग समुद्र किनाऱ्यापर्यंतचा जम्मू ते कन्याकुमारी हा प्रवास अनेकांच्या स्वप्नात असतो. मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे धाडस मोजक्याच जणांकडे असते. माणगाव शहरातील कन्या अपेक्षा रायशेट्टी हिने तब्बल 4000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा सोलो प्रवास करून हे स्वप्न साकार केले असून तिच्या या धाडसी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारताच्या उत्तर ते दक्षिण कण्याला स्पर्श करणाऱ्या या प्रवासात अपेक्षा शेट्टी हिने 12 राज्यांतून प्रवास करत भारताची विविधता आणि संस्कृती जवळून अनुभवली. जम्मू, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून प्रवास करत ती अखेर कन्याकुमारीपर्यंत पोहोचली. या संपूर्ण प्रवासाने तिच्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय अध्याय निर्माण केला. हा प्रवास केवळ अंतर कापण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो जिद्द, सुरक्षितता आणि जबाबदारी यांचा खरा अनुभव देणारा ठरला.
एकटीने इतक्या लांबचा प्रवास करताना रस्त्यावरील अनिश्चितता, हवामानातील अचानक बदल, शारीरिक थकवा आणि विविध अडचणींचा सामना करत तिने धैर्याने प्रत्येक टप्पा पार केला. प्रत्येक अनुभवाने तिचा आत्मविश्वास अधिक बळकट केला. या प्रवासातून अपेक्षा शेट्टीला एक महत्त्वाची जाणीव झाली. मर्यादा आपणच आखतो आणि धाडस केले तर त्या मोडून पुढे जाता येते. रस्त्यावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलची जबाबदारी, सुरक्षिततेचे भान आणि सतत पुढे जाण्याची जिद्द या तीन मूल्यांनी हा प्रवास अधिक अर्थपूर्ण बनवला.
विशेष म्हणजे, अपेक्षा शेट्टीचे बालपण माणगाव शहरातच गेले. तिचे शिक्षण माणगाव कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण झाले. ती माणगावातील श्रद्धा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका हेगडे यांची सुकन्या आहे. त्यामुळे तिच्या या यशामुळे माणगाव शहरातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे. सध्या अपेक्षा शेट्टी या के. रहेजा कॉर्प, बीकेसी या प्रतिष्ठित संस्थेत लर्निंग अँड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिक आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी केलेला हा साहसी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. भारताच्या कण्यावरून केलेली ही 4000 किलोमीटरची सोलो राईड तिच्यासाठी केवळ एक साहसी राईड नव्हती, तर स्वतःला पुन्हा शोधण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे. अपेक्षा शेट्टीच्या या धाडसी उपक्रमामुळे आज अनेक तरुण-तरुणींना एक संदेश मिळतो, स्वप्न मोठे असावे, धाडस मोठे असावे आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणताही प्रवास अशक्य राहत नाही.
