हवामानातील बदलामुळे बागायतदार चिंतेत
| माणगाव | प्रतिनिधी |
हवामानातील सततचे चढ-उतार, पहाटेचे दाट धुके आणि दिवसाच्या तापमानातील अचानक वाढ यामुळे माणगाव तालुक्यातील आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सुमारे 709 हेक्टर क्षेत्रावर आंबा बागायती असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 9,775 हेक्टर क्षेत्र आंबा उत्पादनाखाली आहे. सध्या बहुतांश बागांमध्ये मोहर बहरत असून, काही ठिकाणी लहान फळधारणा सुरू झाली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे मोहरावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
मावा आणि भुरीचा वाढता प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ दाट धुके आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्याने आंबा पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मावा किडीमुळे फुलोऱ्यावर चिकट थर तयार होतो आणि त्यातून बुरशीजन्य रोगांचा प्रसार वेगाने होतो. परिणामी मोहर कोमेजतो, गळतो आणि फळधारणा कमी होते. याचबरोबर भुरी रोगाचा प्रादुर्भावही वाढत आहे. भुरीमुळे मोहर आणि कोवळी फळे काळवंडून वाळू लागतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. काही बागांमध्ये मोहर पूर्णपणे करपल्याची उदाहरणेही पुढे येत आहेत.
माणगाव कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. नुकसानीच्या भरपाईची वाट न पाहता मोहराचे संरक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध फवारणी करावी, असे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उत्पादनावर परिणामाची भीती शेतकऱ्यातून बोलताना व्यक्त होत असून माणगाव तालुक्यातील आंबा हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक मानले जाते. विशेषतः हापूस आंब्यामुळे या परिसराची बाजारपेठेत वेगळी ओळख आहे. मात्र, सध्याच्या हवामान बदलामुळे जर कीडरोगावर वेळेत नियंत्रण मिळाले नाही, तर यंदाच्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील सततच्या बदलामुळे आंबा मोहरावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भुरी रोगामुळे मोहर काळवंडत असून, यंदाचा आंबा हंगाम धोक्यात येण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. वेळेवर फवारणी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच संभाव्य नुकसान टाळता येणार आहे.
फवारणीचे टप्पे
पहिली फवारणी मोहर येण्यापूर्वी सायपरमेथ्रीन 25 टक्के प्रवाही किंवा फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही किंवा डेकामेथ्रीन 2 टक्के प्रवाही औषध खोड, फांद्या व पानांवर सम प्रमाणात फवारावे, दुसरी फवारणी मोहर फुटत असताना - क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति पाणी प्रमाणात फवारावे. यासोबत पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम आणि कार्बेन्डाझिम मिसळल्यास भुरी व करपा रोगावर नियंत्रण मिळविता येते, तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर सुमारे 15 दिवसांनी - इमिडाक्लोप्रिड 17 टक्के 3 मि.ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुरी नियंत्रणासाठी गंधक 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 मि.ली. यांचा वापर करावा. औषधांची मात्रा, पाण्याचे प्रमाण व फवारणीची वेळ याबाबत संबंधित कृषी अधिकारी किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आंबा फळांवर तुडतुडे कीड व भुरी रोगाचा प्रादुर्भाव असल्यास थायमेथॉक्साम 10 लि पाण्यात 1 गॅम + कार्बनडायझीम 20 गॅम मिसळून फवारावे. आंबा फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना 1 टक्के पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात 10 ग्रॅम मिसळून याच्या लीन फवारण्या कराव्या. फळाचे वजन व आकारमान वाढणेस मदत होते. फळाची गुणवत्ता सुधारते व आकर्षक रंग येतो.
