हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर अनेक दुर्घटना

Oplus_16908290

पर्यटकांचे सूचना फलकाकडे दुर्लक्ष

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

दक्षिण काशी म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर महाराष्ट्रात ओळखले जाते. हे ठिकाण भगवान शंकराच्या मंदिरासाठी तसेच समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. भाविक हरिहरेश्वर येथे श्रध्देने येतात, तर पर्यटक सुट्टीच्या दिवसात हजेरी लावतात. मुख्यत्वे उत्तरक्रिया, पिंडदान विधी हे हरिहरेश्वर येथे केले जातात. या कारणास्तव येथील समुद्र किनारा तसेच प्रामुख्याने तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर भाविक, पर्यटकांची कायम वर्दळ असते.

तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावरील खडकांवर अनेकदा उसळणाऱ्या लाटांसोबत फोटो, सेल्फी घेण्याच्या मोहात पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. तर काही पर्यटक नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. हरिहरेश्वर येथील समुद्रात पोहताना भरती व ओहोटी चा अंदाज न आल्यामुळे लाटांच्या तडाख्यात पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा प्रदक्षिणा मार्गावर किंवा समुद्रात पोहायला जाणारा पर्यटक हा स्थानिकांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करताना आढळतो.

हरिहरेश्वर ग्रामपंचायत वतीने तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावरील धोकादायक ठिकाणे व समुद्र किनाऱ्यावर पर्यटक, भाविकांसाठी सूचना फलक उभे करीत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने एखादा प्रसंग उद्भवल्यास आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हरिहरेश्वर ग्रामपंचायत, श्रीवर्धन पोलीस ठाणे, स्थानिक पोलीस पाटील व रेस्क्यू टीमच्या सभासदांचे भ्रमणध्वनी क्रमांक फलकावर टाकण्यात आले आहेत.

हरिहरेश्वर ग्रामपंचायत मार्फत तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर पर्यटकांसाठी सूचना फलक उभे करून सुद्धा अतिउत्साही पर्यटक त्या फलकाकडे तसेच स्थानिक देत असलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येते. पावसाने प्रदक्षिणा मार्गावरील खडक निसरडे झाले आहेत. त्यातच, पावसाळी दिवसात येणारे पर्यटक उधाण, भरती ओहोटीचा अंदाज न घेता फेसाळणाऱ्या लाटा खडकावर उसळणाऱ्या लाटा सोबत सेल्फी, फोटो घेण्यात मग्न होत आहेत. तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर मागील तीन वर्षांत फोटो घेण्याच्या नादात किंवा लाटांचा अंदाज न आल्याने साधारण पणे 5 ते 6 व्यक्ती लाटांच्या तडाख्यात सापडल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, प्रदक्षिणा मार्गावर पाण्यात पडल्यावर वेळेत स्थानिकांची मदत मिळाल्याने बचावलेल्या पर्यटकांची संख्या 25 ते 30 च्या आसपास आहे. वैशिष्ठ्य म्हणजे हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडलेली नाही.

धोक्याची जागा
हरिहरेश्वर येथे दरवर्षी बावीस ते पंचवीस लाख भाविक, पर्यटक भेट देतात. प्रदक्षिणा मार्ग साधारण अर्धा किलोमीटर लांबीचा असून, विष्णूपद व चक्रतीर्थ ही दोन धोकादायक ठिकाणे आहेत. काही भाविकांच्या मते तीर्थक्षेत्र प्रदक्षिणेच्या धोकादायक ठिकाणांवर स्टील रेलिंग बसवल्यास पर्यटकांना धोक्याची जागा असल्याचे लक्षात येईल.

पावसाळी दिवसात भरती ओहोटी व उधाण संदर्भात मंदिराचे येथे सूचना फलक लावण्यात येतो व ध्वनीक्षेपका वरून देखील सूचना करण्यात येतात. परंतु, उत्साही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करून अतिरेक करतात.

सिद्धेश पोवार
सचिव/खजिनदार श्री देव हरिहरेश्वर

Exit mobile version