Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार

48 तासांत 15 जणांचा करुण अंत; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यातील हडपसर, दापोडी-फुगेवाडीत 15 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर अनेकजण अत्यवस्थ असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश वानखेडे याला अटक केली आहे.

मागील 48 तासांत तब्बल 15 जणांचा करुण अंत झाला आहे. गुरुवारी एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भयंकर घटनेनंतर पुण्यातील कायदा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या 15 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याच्या कारणातून झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत लोक हे पुण्यातील हडपसर, दापोडी, फुगेवाडी आणि काळेपडळ भागातील आहेत. सर्वांना सुरुवातीला चक्कर येणे, उलट्या होणे आणि त्यानंतर तोंडाला फेस येणे, अशा प्रकारचा त्रास जाणवू लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील काहींची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून योगेश वानखेडे नावाच्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. वानखेडे हा पुण्यातील मुंढवा परिसरात रहिवासी होता. पुण्यातील उरुळी कांचन आणि पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी येथे हा वानखेडे बनावट दारू बनवत होता. ही बनावट दारू तो पुण्यातील हडपसर, काळेपड आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात विकायचा. ही बनावट दारू पिऊन या सर्वांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून बनावट दारूचे कॅनही जप्त केले आहेत. त्याने स्पिरीटयुक्त दारु बनवली होती. ही दारू प्यायल्याने मद्यपींना त्रास जाणवू लागला, यातूनच हा मृत्यूचा हाहाकार माजला आहे.

या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं तपास यंत्रणा विविध दिशांनी तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version