मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन हवेत विरले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पटनी एनर्जी कंपनीने प्रकल्पाच्या नावाने जमिनी विकत घेतल्या. परंतु, प्रकल्प उभारला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत लढा दिला होता. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी शेतकर्यांना पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही दखल न घेता शेतकर्यांची आश्वासनावर बोळवण केल्याची संतप्त प्रतिक्रिया काही शेतकर्यांनी ‘कृषीवल’शी बोलताना व्यक्त केली.
अलिबाग तालुक्यातील मेढेखार, काळवडखार येथील 475 शेतकर्यांकडून 81 हेक्टर शेतजमीन पटनी एनर्जी व इतर कंपन्यांसाठी विकत घेण्यात आली. अठरा वर्षांपूर्वी एकरी तीन लाख 50 हजार रुपयांनी जमीन विकत घेण्याचे ठरले. परंतु, काही शेतकर्यांना फक्त 50 टक्केच रक्कम देऊन कंपनीने फसविले. प्रकल्पातून मुलांना रोजगार मिळेल अशी आशा शेतकर्यांना होती. परंतु, त्यांची फार मोठी निराशा झाली. जमिनी विकत घेऊन प्रकल्प उभारले नसल्याने ही जागा नापिक झाली आहे. त्यामुळे जमीन परत मिळावी यासाठी मागील वर्षी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, आमदार महेंद्र दळवी यांनी त्यावेळी शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत त्याबाबत कार्यवाही झाली नसल्याची खंत काही शेतकर्यांनी व्यक्त केली. आमदारांनी आश्वासन देऊनही कार्यवाही न झाल्याने अनेक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत शेतकर्यांनी न्यायालयीन लढा सुरू केल्याचे सांगितले आहे.