| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तिरुपती मंदिर लाडू प्रसादप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळामध्ये तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादामध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत होता, असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. लाडू प्रसाद तपासाचा निकाल लागण्याआधीच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा असते. अहवाल जुलैमध्ये आला, मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.