पनवेल महानगरपालिकेच्यावतीने विविध उपक्रम
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत महापालिकेच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून काव्यवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, राज्य गीत प्रसारासाठी फलकाचे अनावरण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच महापालिकेच्यावतीने काव्यसंमलेन व काव्य स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे.
याबरोबरच पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमधून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरावडा काळात निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा व शुध्द लेखन स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या दहाही शाळांमधील विद्यार्थ्याना मराठी भाषेची समृध्दता कळावी, महत्त्व कळावे या उद्देशाने घेण्यात आलेल्या या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
राज्यगीताचा फलक
मराठी राजभाषेचा जास्तीत जास्त प्रसार प्रचार व्हावा, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्यगीताचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यादृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने दिनांक 28 जानेवारी रोजी आयुक्तांच्या हस्ते राज्य गीताच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, उपअभियंता विलास चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते. चार प्रभाग कार्यालये व नाट्यगृह या ठिकाणीही असे फलक लावण्यात येणार आहेत.