| अलिबाग | प्रतिनिधी |
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील मराठी भाषा विभागातर्फे 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पी.एन.पी. माध्यमिक शाळा, वेश्वीचे मुख्याध्यापक निलेश मगर, दै. कृषीवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, महाविद्यालयाचे प्रशासकीय सल्लागार, गबाजी गीते, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मराठी अभिमान गीताने करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील एफ. वाय. बी. ए. ची विद्यार्थिनी सृष्टी पाटील हिने मराठी गौरव गीत सादर केले. यानंतर कला व मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये महाविद्यालयातील मराठी विभागाचा थोडक्यात आढावा घेऊन मराठी भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष म्हणजे मराठी विभागाच्या माझं गाव या विशेषंकाचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले, तसेच या विशेषांकामध्ये ज्या ज्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी लेख लिहिले त्या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये मराठी भाषेप्रती आपली भूमिका मांडताना ईशा पाटील, रिया मुळीक, हर्तिका पाटील, श्वेता शिवलकर, सृष्टी पाटील, विशाल कुशवाल, सार्थक नागावकर, या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक वृंदामध्ये डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. पूजा म्हात्रे, प्रा. वृषाली घरत, प्रा. जयश्री ठाकूर, प्रा. साईनाथ पाटील यांनी मराठी भाषा आणि बोली संवर्धन याविषयी आपली भूमिका व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश मगर यांनी मराठी भाषेची थोरवी व्यक्त केली. मराठीच्या इतिहास आणि परंपरेचा त्यांनी आधुनिक युगाशी सहसंबध व्यक्त करत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. दैनिक कृषीवलचे सहयोगी संपादक व महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी विद्यार्थी सुयोग आंग्रे यांनी मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांप्रती असणारा स्वाभिमान जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीतच मराठी भाषेच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. तसेच मराठीच्या भूतकाळाचा मागोवा घेत वर्तमान काळातील संदर्भ घेऊन भविष्यातील मराठी भाषेविषयी असलेली आपली जबाबदारीची जाणीव व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वक्तव्याचे कौतुक केले. महाविद्यालायचा मराठी विभाग हा कायमच मराठी बोली आणि भाषेचे संवर्धन करीत दरवर्षी असे अभिजात उपक्रम राबवत असतो असे आपले मत प्रतिपादन केले. मराठी भाषा विषयक ‘माझी मराठी’ ही कविता सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभागातील प्रा. रूपाली पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थीच्या पारंपरिक पेहरावाने कार्यक्रमाच्या उत्साहात अधिकच भर पडली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
पी.एन.पी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
