| पनवेल | वार्ताहर |
कलारंजना मुंबई निर्मित, उदय साटम संकल्पित-दिग्दर्शित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाचा 4000वा वैभवशाली भव्यदिव्य प्रयोग व कलारंजना संस्थेचा 32 वा वर्धापनदिन दामोदर हॉल परळ येथे रविवारी (दि.6) संध्याकाळी 5:30 वाजता मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्कार पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांसह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला हाऊसफुल गर्दी केली होती. आजी-माजी 70हून अधिक कलाकारांचा संचात पार पडलेल्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला.

उदय साटम यांची 32 वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली असून आम्ही त्यांना ‘विक्रमादित्य’ ही पदवी बहाल करतो, अशा स्तुतीसुमनांनी मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता महासंघाने उदय साटम यांचा विशेष सन्मान केला. त्याचबरोबर लावणी महासंघ, महाराष्ट्र व गोवा राज्यामधील वितरक, जेष्ठ कलाकार, तंत्रज्ञ, उदय साटम यांचे कुटुंबीय मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उदय साटम यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. यावेळी कलारंजना संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवर व कार्यक्रमातील आजी-माजी कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कलारंजना संस्थेतील ज्येष्ठ कलाकार रविमामा खानोलकर यांना कलाकारांच्यावतीने 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच यापुढेही त्यांच्या पुढील काळात मदतीचे आश्वासन दिले. याप्रसंगी आमदार सुनील राऊत यांनी देखील तत्काळ 25000 रुपयांची मदत दिली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, सोशल सर्व्हिस लीगचे जनरल सेक्रेटरी श्री.मंत्री, सिनेअभिनेते सुशांत शेलार, पार्श्वगायक नंदेश उमप यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.